जून-जुलैत पाणीकपातीची धास्ती
By admin | Published: February 4, 2016 01:43 AM2016-02-04T01:43:53+5:302016-02-04T01:43:53+5:30
तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीकपातीचा समाना करणाऱ्या पुणेकरांचे पाणी संकट आणखी वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौंड आणि इंदापूर या
पुणे : तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीकपातीचा समाना करणाऱ्या पुणेकरांचे पाणी संकट आणखी वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौंड आणि इंदापूर या तालुक्यांतील गावांना पिण्यासाठी पाणी देण्यात आल्यानंतर मे महिन्यात या गावांसाठी आणखी तेवढेच आवर्तन देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मे महिन्यात देण्यात येणारे हे जादा पाणी वाचविण्यासाठी यापुढे दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून पालिकेला देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मे महिन्यात हे पाणी
सोडले गेल्यास पुणेकरांना दिवसाआड पाणी न देता तीन दिवसांनी पाणी देण्याची वेळ येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.काय आहे अडचण ?
महापालिकेकडून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शहराला दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. त्यातच महापालिकेची वितरणव्यवस्था कमी आणि काही तांत्रिक अडचणी असल्याने आठवड्यात कोणत्याही एका दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला, तर त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तीन दिवस लागतील. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावानुसार, एक दिवस पाणी बंद ठेवून शहराला दर तीन दिवसांनंतर पाणी द्यावे लागेल; अन्यथा एक दिवस पूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.कालव्याला असलेली गळती १ टीएमसी धरल्यास प्रत्यक्षात फेब्रुवारी ते जुलैअखेरपर्यंत ६ महिने पालिकेला प्रत्यक्षात ५ ते ५.५० टीएमसी पाणीच मिळणार आहे. महापालिकेला धरणातील साठा कमी पडण्याची शक्यता असल्याने सध्या दिवसाआड सुरू असलेली कपात वाढविण्याशिवाय पर्याय राहणार नाही. काय आहे पाटबंधारे विभागाचे गणित ?
पाटबंधारे विभागाकडून मे महिन्यातही या दोन तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पाणी सोडल्यानंतर धरणात शिल्लक राहणारे पाणी पुणे शहराला जुलैअखेरपर्यंत दिवसाआड दिले, तरच पुरेल.
मे महिन्यासाठी पाणी दिल्यास पाणीकपात वाढवावी लागणार आहे. त्यामुळे ही कपात टाळायची असेल, तर या महिन्यापासूनच आठवड्यातून एकदा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पालिकेने बंद ठेवावा, असा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडून महापालिकेसमोर ठेवण्यात आला आहे. हे पाणी बंद ठेवल्यास जुलैअखेरपर्यंत महापालिकेला दीड टीएमसी पाणीबचत करता येईल आणि बचत झालेले पाणी जिल्ह्यासाठी सोडत येईल.