जून संपला, तरी पुरंदर तहानलेलेच!
By Admin | Published: June 29, 2017 03:35 AM2017-06-29T03:35:45+5:302017-06-29T03:35:45+5:30
पावसाळा सुरू होऊन जून महिना संपत आला, तरीही पुरंदर तालुक्यातील आजही सुमारे ४४, ६४४ लोकसंख्येला २२ टँकरच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : पावसाळा सुरू होऊन जून महिना संपत आला, तरीही पुरंदर तालुक्यातील आजही सुमारे ४४, ६४४ लोकसंख्येला २२ टँकरच्या ५१ खेपांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. जून महिन्यात सर्वदूर पर्जन्यमान समाधानकारक असले, तरीही पुरंदर तालुक्यात अजून पावसाने हुलकावणीच दिलेली आहे.
जून महिन्यात आजअखेर केवळ ६९ मिमी सरासरी पाऊस झाला आहे. तालुक्यातील पर्जन्य मापककेंद्रांची माहिती घेतली असता सासवड (७९ मिमी), जेजुरी (१०८ मिमी), राजेवाडी (४ मिमी), वाल्हे (१०० मिमी), परिंचे (५७ मिमी), कुंभारवळण (४१ मिमी), भिवडी (९२ मिमी), एवढे पर्जन्यमान राहिल्याचे सांगण्यात आले. यात पुरंदर किल्ल्याच्या परिसरात चांगला पाऊस झाला असल्याने तेथील दोन गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली असली, तरी उर्वरित तालुक्यातील १० गावठाणी आणि १६० वाड्या-वस्त्यांवर आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. येथील ४४ हजार ६४४ लोकसंख्येला आजही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.
पावसाळा सुरू झाला असल्याने शासकीय पातळीवरून टँकर बंद करण्याची शक्यता गृहीत धरून शेतकरी व ग्रामपंचायतींकडून एवढ्यात टँकर बंद करू नयेत, अशीच मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.