‘माय मराठीच्या लेकी’चा स्त्रीशक्तीचा जागर
By admin | Published: June 21, 2017 06:17 AM2017-06-21T06:17:38+5:302017-06-21T06:17:38+5:30
विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रीशक्तीचा जागर, अडाणी असूनही जीवनाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या बहिणाबाई, मराठीतील पहिली कवयित्री म्हणून गणल्या जाणाऱ्या मुक्ताबार्इंपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रीशक्तीचा जागर, अडाणी असूनही जीवनाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या बहिणाबाई, मराठीतील पहिली कवयित्री म्हणून गणल्या जाणाऱ्या मुक्ताबार्इंपासून मोगुबाई कुर्डीकर, सुधा करमरकर असा स्त्रीशक्तीचा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडत गेला. पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत ‘ती’ने घेतलेली गरुडझेप नृत्य, गायन, वादनाच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात अवतरली.
निमित्त होते, विद्या सहकारी बँकेच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित चौरंग निर्मित अशोक हांडे आणि कलाकारांच्या संचाने सादर केलेल्या ‘माय मराठीच्या लेकी’ या अनोख्या गीत-संगीत आणि नृत्यमय कार्यक्रमाचे. सुमारे १५०-२०० कलाकारांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमातून स्त्रीने आकाशाला घातलेली गवसणी, तिने सर्व क्षेत्रे पादाक्रांत करत सिद्ध केलेले अस्तित्व उलगडत गेले. ‘जय शारदे वागेश्वरी’ या गाण्याने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. मुक्ताबार्इंची ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’, ‘मुंगी उडाली आकाशी’, जनाबार्इंचे ‘दळिता कांडिता’, जिजाऊंचे ‘निज निज रे शिवराया’, अहल्याबाई होळकरांचे कर्तृत्व सांगत सादर झालेले ‘श्रमिक हो घ्या इथे विश्रांती’, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी गाजवलेला पराक्रम अशी गाथा सादर झाली.
सावित्रीबाई फुले यांनी रोवलेली शिक्षणाची मुहुर्तमेढ युवतीने नाटिकेतून सादर केली. एकीकडे स्त्री गरुडझेप घेत असताना दुसरीकडे नाचगाण्यातून उदरनिर्वाह करणाऱ्या कलावंतीणीचे जीवनही या कार्यक्रमातून रेखाटण्यात आले. शास्त्रीय संगीतात मोगूबाई कुर्डीकरांपासून किशोरी आमोणकर, अश्विनी भिडे-देशपांडे, तसेच विजया मेहता, सुधा करमरकर यांचे कार्यकर्तृत्व, मराठी चित्रपटातील नायिकांचा प्रवास ‘देव जरी मज’, ‘मन शुद्ध’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘आता कशाला उद्याची बात’ अशा गाण्यांमधून प्रेक्षकांसमोर उभा राहिला. संपदा जोगळेकर यांनी ‘ती फुलराणी’ मधील स्वगत सादर केले. प्रीती वारियार या केरळी तरुणीने सुमधुर आवाजाने सर्वांची मने जिंकली. यावेळी डिफेन्स अकाऊंट, कॉसमॉस, म्युनिसिपल सर्व्हंट्स, पुणे अर्बन, पुणे मर्चंटस, राजगुरुनगर सहकारी, मुस्लिम को-आॅप बँक, जनता सहकारी, पुणे पीपल्स, गणेश सहकारी, वालचंदनगर सहकारी आणि बारामती सहकारी बँकांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा गौरव करण्यात आला. सेनापती बापट रस्ता शाखेला सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्काराने मिळाला. अरविंद खळदकर यांनी मनोगत व्यक्त केले. अनास्कर यांनी प्रास्ताविक केले.