कोंढापुरीतील पाणी योजना ठप्प
By admin | Published: July 25, 2015 05:02 AM2015-07-25T05:02:59+5:302015-07-25T05:02:59+5:30
कोंढापुरी (ता. शिरुर) येथील तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. या तलावाच्या मुख्य स्रोतावर अवलंबून असलेली रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायतीच्या
रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरुर) येथील तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. या तलावाच्या मुख्य स्रोतावर अवलंबून असलेली रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेली १६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी पूर्णत: बंद पडली आहे. ग्रामस्थांना ऐन पावसाळी हंगामातही भीषण पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.
अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या महागणपतीच्या रांजणगावची लोकसंख्या स्थायी आणि अस्थायी अशी अंदाजे २५ हजारांच्या आसपास पोहोचली आहे. महागणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा वाढता ओघ, परिसरात असलेल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या हजारो कामगारांचे वास्तव्य, यामुळे वाढती लोकस्ांख्या विचारात घेऊन ग्रामपंचायतीने नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली.
१० टक्के लोकवर्गणीतून माजी जि. प. सदस्य शेखर पाचुंदकर व शिरूर बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे १६ कोटी रुपये खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना राबवली. ती २ वर्षापूर्वीपासून कार्यान्वित करण्यात आली होती.
या महत्त्वाकांक्षी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कोंढापुरी तलावाचा मुख्य स्रोत म्हणून वापर सुरू होता. मात्र, राज्यात बहुतांशी भागात पावसाने दडी मारल्याने व शिरूर तालक्यातही समाधानकारक पाऊस नसल्याने परिसरातील बंधारे, तलाव, ओढे, नाले, नद्या अद्यापही पाण्याअभावी तहानलेल्याच आहेत.
सध्या पावसाळी हंगाम सुरू असूनही पावसाअभावी तलावात पाणीच शिल्लक नाही. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. त्यामुळे रांजणगावकरांना ऐन पावसाळ्यातही भीषण पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली
आहे.
नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करुन पाण्याची बचत करावी, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी विजय सोनवणे यांनी नागरिकांना केले आहे. (वार्ताहर)