मुठा नदीत जीवघेण्या कसरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 02:19 AM2018-08-26T02:19:40+5:302018-08-26T02:19:53+5:30
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस होत असल्याने पुण्यातील अनेक धरणे भरली आहेत. खडकवासला धरणातून मोठा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरुन वाहत आहे. या पाण्यात काही तरुण धोकादायकरीत्या पोहत आहेत. त्याचबरोबर या मुलांसोबत काही लहान मुलेही नदीच्या पाण्यात उतरत आहेत. परिणामी त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
पुण्यातील सर्वच धरणे जवळपास पूर्ण भरली आहेत. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे नदी दुथडीभरुन वाहत आहे. गेल्या काही दिवसांत खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने पुण्यातील महत्त्वाचा असा भिडे पूल अनेकदा पाण्याखाली गेला होता. त्यामुळे पोलिसांनी या पुलावरील वाहतूक बंद केली होती. मुठा नदीला लागून असलेल्या दत्तवाडी भागातील काही तरुण आणि चिमुकले हे मुठा नदीच्या पाण्यात धोकादायकरीत्या पोहत असतात. पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने तसेच पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने एखादा अपघात घडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी एक लहानगा पाणी वाहत असलेल्या एका छोट्या पूलावरुन सायकल चालवत असल्याचे समोर आले होते. त्याचबरोबर अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी नदीपात्राजवळ जात पाण्याजवळ सेल्फी घेत असल्याचेही समोर आले होते. खडकवासला धरणातून नदीमध्ये पाणी सोडल्यावर नदीपात्राजवळ कोणी जाऊ नये असे आवाहन पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येते, परंतु काही तरुणांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते.
नदीत उतरणे धोकादायक
महिन्याभरापूर्वी संगमवाडी येथे एक चिमुकला नदीपात्रात सायकल चालवित असताना पाण्यात बुडाला होता. दोन दिवसांनी त्याचा मृतदेह दूरवर आढळला होता. पावसाळ्यात नदीत उतरणे धोकादायक असताना याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.