जुन्नर-इंदापूर बससेवेचा शुभारंभ
By Admin | Published: January 6, 2017 06:22 AM2017-01-06T06:22:23+5:302017-01-06T06:22:23+5:30
जुन्नर शहरातील व परिसरातील व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी रात्रीच्या ९.३०ची एसटी बस राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा सुरू केली आहे
जुन्नर : जुन्नर शहरातील व परिसरातील व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी रात्रीच्या ९.३०ची एसटी बस राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा सुरू केली आहे. पुणे येथे विविध कामे करून रात्री ९.३० च्या एसटी बसने पुन्हा जुन्नरला येण्यासाठी हक्काची गाडी मिळाल्याने व्यापारी, नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
जुन्नर शहर व परिसरातील व्यापारी व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात पुणे येथे जातात. मात्र मागील वर्षापासून रात्रीची पुणे-जुन्नर बस बंद करण्यात आल्याने व्यापारी वर्गाची गैरसोय होत होती. जुन्नर शहरातील व्यापारी व नागरिक सामाजिक संस्था हा विषय अनेक वेळा महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही रात्रीची बस सुरू होत नव्हती.
सोमवारी (दि. २) सकाळी ९.१५ वाजता जुन्नर- इंदापूर ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासात सायंकाळी ५.३० वा. इंदापूरहून निघणार आहे. आणि ९.३० वा. पुण्यात येणार आहे. या बससेवेचा शुभारंभ शिवसेनेचे नगराध्यक्ष श्यामराव पांडे, गटनेते दीपेशसिंह परदेशी यांच्या हस्ते केला. बसचे चालक व वाहक यांचा सत्कार केला. शिवसेनेने नगरपालिका निवडणुकीत दिलेल्या वचनाची पूर्ती केल्याचे नगराध्यक्ष श्यामराव पांडे व गटनेते दीपेशसिंह परदेशी यांनी स्पष्ट केले. नगरसेवक समीर भगत, नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, अविनाश कर्डिले, संतोष रासने, सचिन खत्री, प्रदीप होगे, नीलेश गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)