जुन्नर नगरपालिकेच्या विकासकामांची होणार चौकशी
By admin | Published: March 10, 2017 04:41 AM2017-03-10T04:41:52+5:302017-03-10T04:41:52+5:30
शहरात नगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कामकाजाबाबत झालेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित कामांची चार सदस्यीय
जुन्नर : शहरात नगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कामकाजाबाबत झालेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित कामांची चार सदस्यीय कमिटीद्वारे चौकशी करण्यात यावी, तसेच याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असा आदेश पत्राद्वारे दिला आहे.
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कदम यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, नगरविकास मंत्रालय यांच्याकडे तक्रार केली होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका प्रशासन शाखा पुणे यांच्या वतीने हे पत्र जुन्नर उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
चार सदस्यांची चौकशी समिती राहणार असून समितीचे प्रमुख म्हणून जुन्नरचे उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, नगररचनाकार पुणे तसेच आळंदी नगरपालिकेचे लेखा परिक्षण अधिकारी यांचा समितीत समावेश आहे.
तक्रारदाराने केलेल्या आरोपांची दखल घेऊन जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांची या समितीकडून चौकशी करण्यात यावी व याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा, असे पत्रात म्हटले आहे.
कर आकारणीचे कामकाज खाजगी एजन्सीमार्फत करून नगरपालिकेचे आर्थिक नुकसान , रेनवॉटर हार्वेस्टिंग युनिट्सच्या कामात २६ लाख रुपयांचा भ्रष्टाचार, आॅनलाईन निविदेचा फार्स, रेनवॉटर हार्वेस्टिंगकरिता बोअर वेल घेण्यात आल्या; परंतु बोअरसाठी अद्याप वीजजोड घेण्यात आलेले नाहीत. शिवनेरी किल्ला परिसर विकास योजनेतून शहरात एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ६५ लाख ७८ हजार रुपयांची निविदा मागविण्यात आली. प्रत्यक्षात आॅनलाईन निविदेचा फार्स करण्यात आला. यातही भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचीही तक्रार कदम यांनी केली होती. पाइप गटारयोजनेचे कामेही निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. (वार्ताहर)