जुन्नर तहसील कार्यालयाला टाळे ठोकणार

By admin | Published: April 24, 2017 04:26 AM2017-04-24T04:26:48+5:302017-04-24T04:26:48+5:30

आपटाळे येथील मंडल अधिकारी कार्यालयात अधिकारी मद्यधुंद अवस्थेत कार्यालयीन वेळेत झोपतात. त्यामुळे त्यांच्यावर

Junnar tahsil office will be stopped | जुन्नर तहसील कार्यालयाला टाळे ठोकणार

जुन्नर तहसील कार्यालयाला टाळे ठोकणार

Next

जुन्नर : आपटाळे येथील मंडल अधिकारी कार्यालयात अधिकारी मद्यधुंद अवस्थेत कार्यालयीन वेळेत झोपतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्याला तुमच्या जुन्नरमधील सर्वच माणसे रोजच रात्री दारू पितात. तसेच सकाळपर्यंत त्यांच्या तोंडाचा वास येतो, अशी वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या तहसीलदार आशा होळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जुन्नर तहसील कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
जुन्नर तालुक्यात रुजू झाल्यापासून कार्यपद्धतीने वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदारांची तातडीने बदली करण्यात यावी. तसेच शासकीय सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी आमदार सोनवणे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. हा कार्यकर्ता व तहसीलदार यांच्यातील वादग्रस्त संभाषणाची आॅडिओ क्लीप व्हायरल झाल्याने तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या वादग्रस्त वक्तव्याबाबत तहसीलदारांवर जनतेच्या वतीने अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.
टाळे लावा आंदोलनासाठी नागरिकांनी जुन्नर महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत लेखी तक्रार आमदारांच्या कार्यालयात आणून देण्याचे आवाहन त्यांनी केले. तहसील कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पालकमंत्री यांना जुन्नर येथे बोलावूनच आंदोलन थांबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवारी (दि. १९) महसूल भवन येथील कार्यालयात एक मंडलाधिकारी मद्यधुंद अवस्थेत झोपले असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आपटाळे येथील कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली. या वेळी झालेल्या संभाषणात तहसीलदार संबंधित कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप हा कार्यकर्ता करीत असतानाच बोलण्याच्या ओघात तहसीलदारांनी ही आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने या प्रकरणाला आता वेगळा रंग आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Junnar tahsil office will be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.