जुन्नर तालुक्याचं जागतिक ‘लेणं’ पर्यटनापासून वंचित! जाण्यासाठी मार्ग नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:15 AM2018-01-01T04:15:47+5:302018-01-01T04:15:56+5:30
‘लेणं’ हे नेहमीच सौंदर्य खुलविण्याचं काम करतं; मात्र जुन्नर तालुक्यात असणारं जागतिक दर्जाचं ‘लेणं’ हे केवळ मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आणि शासनाच्या उदासीनतेमुळे पर्यटनापासून वंचित आहे. जुन्नरमधील हे ‘लेणं’ प्राचीन काळापासून जुन्नरच्या वैभवसंपदेत भर घालत असून, जुन्नरच्या नैसर्गिक सौंदर्याचा खºया अर्थाने एक दागिनाच आहे;
- अशोक खरात
खोडद : ‘लेणं’ हे नेहमीच सौंदर्य खुलविण्याचं काम करतं; मात्र जुन्नर तालुक्यात असणारं जागतिक दर्जाचं ‘लेणं’ हे केवळ मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आणि शासनाच्या उदासीनतेमुळे पर्यटनापासून वंचित आहे. जुन्नरमधील हे ‘लेणं’ प्राचीन काळापासून जुन्नरच्या वैभवसंपदेत भर घालत असून, जुन्नरच्या नैसर्गिक सौंदर्याचा खºया अर्थाने एक दागिनाच आहे; मात्र या लेण्यांकडे जाण्यासाठी मार्ग नाहीत, माहिती फलक नाहीत,अनेक ठिकाणी आग्यामोहोळे आहेत, यामुळे जागतिक दर्जाचं हे ‘लेणं’ पर्यटनापासून वंचित आहे.
जुन्नर तालुक्यात अनेक वर्षांपासून नैसर्गिक सौंदर्यात भर घालत उभ्या असणाºया बुद्ध लेण्या आणि जैनलेण्या या प्राचीन संस्कृतीचा वारसा आहेत. जणू या लेण्या प्राचीन इतिहासाची साक्ष देतच उभ्या आहेत. या लेण्या पाहण्यासाठी व त्यांचा अभ्यास करण्यासाठी येथे अनेक विदेशी पर्यटक नेहमी येण्याचा प्रयत्न करीत आहेत.
संपूर्ण जगात कमीतकमी भू-भागावर सर्वाधिक लेण्या असणारं एकमेव ठिकाण म्हणजे जुन्नर तालुका होय. भारतातील सर्वांत जास्त लेणी या जुन्नर तालुक्यात आहेत. खानापूर जवळील मानमोडी डोंगरात अंबाअंबिका लेणी समूह कोरला आहे. यात भीमाशंकर लेणी, अंबा अंबिका आणि भूतलेणीचा समावेश आहे. जुन्नर तालुक्यात असणाºया सर्व लेणी या काही जैन लेणी, तर काही बौद्ध लेणी आहेत.
जुन्नरमधील लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वप्रथम खोदण्यात आलेली पहिली लेणी ही जुन्नर तालुक्यात आहे. येथूनच लेण्यांच्या कामांना सुरुवात झाली. येथे सुमारे ३५० लेणी आढळतात. येथील भूतलेणीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशद्वारावर बुद्धांची आई राणी महामाया यांचे शिल्प कोरलेले आहे. अशोक चक्र या लेणीमध्ये कोरलेले पाहायला मिळते. या लेणीचे प्रवेशद्वार हे भारतातील सर्वांत सुंदर असे नक्षीकाम केलेले लेणी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला बुद्ध स्तुपाच्या बाजूला मनुष्य प्रतिमा कोरल्या आहेत. एकाच्या डोक्यावर नाग आहे आणि दुसºयाच्या गरुडाचे शिल्प. बुद्धकाळामध्ये नाग आणि गरुड या दोन वंशाचे राजे लोक राहत होते. या दोघांमध्ये सतत युद्ध होत असत, जेव्हा या दोन्ही लोकांना बुद्ध शिकवण मिळाली ते आपापसांतील वैर विसरून बुद्ध स्तुपाच्या पूजेसाठी एकत्र आले आहेत, असा तो प्रसंग तिथे कोरलेला पाहायला मिळतो. त्याच्या खालील बाजूला बुद्ध प्रतीक असलेले बोधी वृक्ष सुद्धा कोरलेले आहे.
बुद्धांची आई राणी महामाया यांना जे स्वप्न पडले होते त्यात दोन हत्ती राणी महामायेस उचलून घेऊन एका सरोवरामधे नेतात आणि ते हत्ती राणीस स्नानं घालत आहेत असे जे स्वप्नशिल्प आहे, ते या लेणी प्रवेशद्वारावर कोरलेले दिसते. दोन हत्ती राणी महामायेस स्नान घालत आहेत आणि त्या शेजारी राजा शुद्धोधन व राणी महामायेस संतती प्राप्त होणार, या आनंदात लोक नाचत आहेत असे ते शिल्प येथे कोरलेले दिसते. लेणीच्या आतमधे चैत्य स्तुप, बाजूला बौद्ध भिक्खूसाठी संघाराम, राहण्यासाठी व ध्यान करण्यासाठी कक्ष कोरले आहेत.
लेणीकडे जाण्यासाठी जंगलातून जावे लागते
लेणी अभ्यासक महेंद्र शेगावकर म्हणाले की, जुन्नर तालुक्यात भारतातील सर्वांत जास्त लेणी असूनदेखील या लेण्यांकडे पर्यटक मोठ्या संख्येने जात नाहीत, कारण या लेण्यांपर्यंत जाण्यासाठी कोणताही मार्ग किंवा माहिती फलक नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. लेण्यांना रेलिंग नाहीत, वस्तूसंग्रहालय नाही, लेणीकडे जाण्यासाठी जंगलातून जावे लागते.
या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक लोक येत असतात पण खुप वेळा अभ्यासकांना लेणीवरील आग्यामोहोळाच्या माशांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व लेण्या इ.स.पूर्व २ ºया ते ५ व्या शतकात खोदण्यात आल्या आहेत.या लेण्यांच्या माध्यमातून जुन्नर मध्ये जागतिक दर्जाचं पर्यटन करता येईल.