जुन्नर पर्यटनाचा आराखडा तज्ज्ञ समितीकडून करावा, शुभंकर म्हणून बिबट्या किंवा शेकरुचा उपयोग करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:00 AM2018-04-05T03:00:16+5:302018-04-05T03:00:16+5:30
राज्य शासनाच्यावतीने तालुक्याला पर्यटनाला विशेष दर्जा दिल्यानंतर स्वैर पर्यटनामुळे भविष्यातील धोके ओळखून सविस्तर विकास आराखडा बनविताना विशेष काळजी घेण्यात यावी. यासाठी तालुक्यातील पश्चिम घाटातील जैवविधतेतच्या संवदेनशील क्षेत्रांच्या निश्चितीबरोबरशुभंकर म्हणून बिबट्या किंवा शेकरूचा उपयोग करावा.
जुन्नर - राज्य शासनाच्यावतीने तालुक्याला पर्यटनाला विशेष दर्जा दिल्यानंतर स्वैर पर्यटनामुळे भविष्यातील धोके ओळखून सविस्तर विकास आराखडा बनविताना विशेष काळजी घेण्यात यावी. यासाठी तालुक्यातील पश्चिम घाटातील जैवविधतेतच्या संवदेनशील क्षेत्रांच्या निश्चितीबरोबरशुभंकर म्हणून बिबट्या किंवा शेकरूचा उपयोग करावा. तर आराखडा बनिवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी मागणी सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक आणि पर्यटन विकास महामंडळाकडे केली आहे.
याबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री म्हणाले, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक थंड हवेची पर्यटनस्थळे ठिकाणे असणाऱ्या महाबळेश्वर आणि माथेरान या स्थळांवरील गर्दीमुळे जुन्नर तालुका या पर्यटन स्थळांना समर्थ आणि सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे. यामुळे पर्यटकांचा ओघ वाढत असून, पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या नियोजनाअभावी भविष्य पर्यावरणाबरोबच अनेक धोक्यांचा संभव आहे.
यामुळे सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी तज्ज्ञांची समितीद्वारे करण्यात यावा. तालुक्यातील पश्चिम घाट परिसर हा जैवविविधतेचा समृद्ध आणि संवेदनशील भाग आहे.
याभागामध्ये कासपठारावरील स्वैर पर्यटनामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी या
क्षेत्रांची निश्चिती करून, या परिसरातील किमान पाच किलोमीटर परिघात पर्यटकांच्या वाहनांना प्रवेशबंदी असावी. याबाबतची मागणी आम्ही यापूर्वीच केली असून, याला गती देण्यात यावी, असे कळविले आहे.
काही महत्त्वाच्या मागण्या
अशा ठिकाणी जाण्यासाठी माथेरानच्या धर्तीवर घोडे, घोडागाडी, बग्गी, बैलगाड्यांचा वापर करावा. यामाध्यमातून स्थानिकांसाठीदेखील रोजगारनिर्मिती होईल.
तालुक्यात धरणांची श्रृखंला असून या धरणांमध्ये जलक्रीडा आणि सी प्लेनसारख्या सेवा सुरू करण्यात याव्यात.
तालुक्यातील मोठा भूभाग हा डोंगरी असून, विविध घाटरस्ते आणि विविध किल्ल्यांचा समावेश आहे. त्यांच्या विकासाबरोबर साहसी क्रीडा प्रकारांना चालना देणारी केंद्रे स्थापन करावीत.
डोंगरी भागामुळे अपघातांचा धोका लक्षात घेता आपत्कालीन यंत्रणा उभारावी.
डेक्कन कॉलेजच्या विविध उत्खननामधून इसवीसन पूर्व काळातील तालुक्याचा इतिहास समोर आला आहे. कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांची तालुक्याबाबत विशेष आस्था असून, त्यांनी विविध व्याख्यानांमधून तालुक्याच्या पर्यटन विकासावर माहिती सादर केली आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. तर शिवनेरी किल्ला विकासाच्या माध्यमातून तालुक्यातील निसर्ग पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवणारे तत्कालीन उपवनसंरक्षकअशोककुमार खडसे यांची समितीवर निवड करावी.
- संजय खत्री
सह्याद्री गिरीभ्रमण संस्था