भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जुन्नरच्या ३३ क्रांतिकारकांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:56+5:302021-08-15T04:13:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खोडद : भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यलढा महत्वपूर्ण आहे. अनेकांनी स्वतंत्र भारताच्या स्वप्नासाठी प्राणाची आहुती दिली, ...

Junnar's contribution of 33 revolutionaries in India's freedom struggle | भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जुन्नरच्या ३३ क्रांतिकारकांचे योगदान

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जुन्नरच्या ३३ क्रांतिकारकांचे योगदान

लोकमत न्यूज नेटवर्क

खोडद : भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यलढा महत्वपूर्ण आहे. अनेकांनी स्वतंत्र भारताच्या स्वप्नासाठी प्राणाची आहुती दिली, तर अनेक जणांनी तुरुंगवास भोगला. त्यांच्या या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत. या स्वातंत्र्य लढ्यात जुन्नर तालुक्यातील ३३ क्रांतिकारकांनी सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे. त्यांचे हे कार्य जुन्नरसाठी गौरवशाली बाब आहे. या ३३ क्रांतिकारकांचा, त्यांनी केलेल्या कार्याचा एकत्रित संग्रह करून त्यांचे जतन केले जाणार आहे.

नारायणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे प्रा. डाॅ. लहू गायकवाड आणि प्रा. डॉ. नवनाथ वाजगे यांनी विशेष प्रयत्न करून हा संग्रह तयार केला आहे. तालुक्यातील जुन्या पिढीतील लोकांसोबत संवाद साधून ऐतिहासिक कागदपत्रे गोळा करून एकत्रित असा ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीत जुन्नर तालुक्याचे योगदान’ म्हणून पुस्तकरुपात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी प्रकाशित होणार आहे.

जुन्नर प्रांतात महादेव कोळी आदिवासी समाज पूर्वापार या भागातील डोंगरी गड-किल्ल्यांचे रक्षण आणि देखभाल करीत आला आहे. यामध्ये अगदी मुगल काळापर्यंत कोणतीही ढवळाढवळ केंद्रीय सत्तांनी केली नव्हती. ब्रिटिश कालखंडात १८१८ मध्ये या गडकोटांच्या पायऱ्या, तटबंदी आणि बुरूज सुरुंगाने उडवून दिले. यामुळे या सर्व समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आणि हे बंड करून लढण्यासाठी सज्ज झाले. याचा परिणाम म्हणून १८३० मध्ये जुन्नर परिसरात ब्रिटिशांविरोधात मोठे बंड पेटले. या बंडाचे नेतृत्व रामचंद्र गोरे, भाऊ खरे, चिमणाजी जाधव, नाना दरबारे इत्यादी मंडळींनी केल्याच्या नोंदी सापडतात. यापैकी रामचंद्र गोरे यांना ब्रिटिश सरकारने फासावर चढविले आणि त्यांच्या ५४ सहकाऱ्यांना आजन्म कारावासाची शिक्षा दिली. तरीही हे बंड मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारला पुढील २० वर्षे प्रयत्न करावे लागले. १९२० ते १९३० या कालावधीत कोंडाजी नवले या आदिवासी क्रांतिकारकाने ब्रिटिश सरकारला आणि स्थानिक सावकारांना पुरते जेरीस आणले होते. त्यांना पिलाजी बोराडे, लव्हाजी बोराडे, अनाजी साबळे, गणा आंबकर, गणपत बोराडे यांनी साथ दिली. कोंडाजी नवलेला पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने स्थानिकांना विविध प्रलोभने दाखवणे, दडपशाही करणे, स्वतंत्र पोलीस पथकाच्या नियुक्त्या करणे, प्रसंगी बक्षिसे जाहीर करणे, धाडी टाकणे असे विविध प्रकार करुन पाहिले. परंतु स्थानिकांच्या पाठिंब्यावर आणि सह्याद्रीतील कडेकपारीच्या साथीने कोंडाजी नवले हा सावकारांना जेरीस आणत राहिला. या क्रांतिकारकाने सामान्य नागरिकांना कधीच त्रास दिला नाही. कोंडाजी नवलेच्या मागावर पुढे मे १९४० मध्ये डीएसपी हायलँड यांना जुन्नरला पाठविण्यात आले. त्याने जुन्नरच्या डोंगरकपारीत, दौंड्या डोंगरात, कधी घनदाट जंगलात, तर कधी आडरानाच्या गावात लपून असलेल्या कोंडाजी नवलेला शोधण्याचे खूपच प्रयत्न केले. अखेर जुलै १९४० मध्ये पोलीस चकमकीत अखेर कोंडाजी ठार झाले.

चौकट

जुन्नर या शिवजन्मभूमीतून मोठ्या प्रमाणात भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पाठबळ देण्यात आले. मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, ओतूरचे साराबंदी आंदोलन, आदिवासींच्या न्याय्य-हक्कासाठी उभारलेले सशस्त्र लढे, भूमिगत क्रांतिकारकांचे कार्य, ओतूर येथील मुलींची शाळा उभारणी, जुन्नर कोर्टातील ऐतिहासिक खटला, खादी आणि स्वदेशीचा प्रसार, नाटक कंपन्यांच्या माध्यमातून जनजागृती, शाहीर आणि तमाशा कलेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचून स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी जुन्नर तालुका अग्रभागी होता हेच अधोरेखित होते.

प्रा. डॉ. लहू कचरू गायकवाड, इतिहास लेखक व अभ्यासक, नारायणगाव

130821\0304picsart_08-13-02.35.16.jpg

डॉ.लहू गायकवाड यांनी लिहिलेले स्वतंत्र लढ्यातील जुन्नर तालुक्याचे योगदान हे पुस्तक

Web Title: Junnar's contribution of 33 revolutionaries in India's freedom struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.