कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जुन्नरच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 11:43 PM2021-08-29T23:43:57+5:302021-08-29T23:44:55+5:30
मुलाच्या लग्नात १८०० ते २००० हजार नागरिक
जुन्नर : मागील दोन दिवसांपासून समाज माध्यमावर, तसेच जुन्नर तालुक्यात चर्चेत असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्यावर मुलाच्या विवाह सोहळ्यात गर्दी जमावल्याप्रकरणी रविवारी (दि. २९) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासह वधुपिता आणि कार्यालयाच्या मालकावर विवाहासाठी बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी ही माहिती दिली. पोलीस अंमलदार अमोल शिंदे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.
जुन्नर शहरालगत असलेल्या महालक्ष्मी मंगल कार्यालय, बारव येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्या दोन २ मुलांचा विवाहाचा कार्यक्रम शनिवारी (दि. २८) पार पडला. परंतु, या लग्नास मर्यादेपेक्षा जास्त म्हणजे जवळपास १८०० ते २००० लोकांची गर्दी जमली होती.
याबाबत पोलिसांना कळल्यावर पोलीस घटस्थाळी गेले. त्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरू असलेल्या उपाययोजनाचा भाग म्हणून राज्यात लागू असलेल्या साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत तसेच जिल्हा अधिकारी पुणे य जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील लग्नात लोक जमा करून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, वरपिता देवराम लांडे, वधुपिता एकनाथ कोरडे, वधुपिता सुधीर नामदेव घिगे, बाळु सखाराम लांडे, चैतन्य मिंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नाच्याा या कार्यक्रमासाठी तसेच साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हेलिकॉप्टरने येणार असल्याची चर्चा होती. यासाठी हेलिपॅड देखील उभारण्यात आले होते. परंतु, अजित पवार लग्न समारंभासाठी उपस्थित राहिले नाहीत.