जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचे संपूर्ण लसीकरण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:42+5:302021-06-16T04:14:42+5:30
-- जेजुरी : जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखान्यातील कामगार, अधिकारी यांचे १०० टक्के लसीकरण करण्याची योजना केली असून ...
--
जेजुरी : जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखान्यातील कामगार, अधिकारी यांचे १०० टक्के लसीकरण करण्याची योजना केली असून यासाठी उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले.
जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील जीमा संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. जीमाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, कार्याध्यक्ष रवींद्र जोशी, माजी अध्यक्ष प्रकाश खाडे, शकील शेख आदी या वेळी उपस्थित होते.
जगताप म्हणाले की, औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांची संख्या मोठी असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांचे लसीकरण होण्याची आवश्यकता आहे यासाठी कंपन्यांनी आपल्या येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार कराव्यात, आपल्या मागणीनुसार काही खासगी हॉस्पिटलमध्ये लस देण्याची व्यवस्था करता येईल.
पुरंदर तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार निर्मिती योजना सुरू करणार असून, जेजुरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जीमा यांच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात येणार आहे यासाठी कारखान्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे तालुक्यातील तरुणांना तांत्रिक शिक्षण मिळून येथेच रोजगार उपलब्ध होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, योजना यशस्वी होण्यासाठी समन्वयक म्हणून त्र्यंबक मानसिंगराव काकडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. असे आमदार संजय जगताप म्हणाले.
प्रास्ताविक रवींद्र जोशी यांनी केले. व आभार पांडुरंग सोनवणे यांनी मानले
--
फोटो क्रमांक : १४ जेजुरी आमदार जगताप
फोटो ओळी : उद्योजकांना मार्गदर्शन करताना आ. संजय जगताप.