Social Media | सोशल मीडियावर जरा जपूनच...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 03:45 PM2022-06-04T15:45:59+5:302022-06-04T15:50:01+5:30
कमिशन वाचेल पण मनस्ताप होणार नाही याची घ्या काळजी...
दैनंदिन आयुष्यात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मोबाइलमध्ये जणू संपूर्ण जग आपल्या हातात आल्यासारखे वाटते. त्यामुळे अगदी नाष्टा करण्यासाठी चांगले हॉटेल कोठे या पासून ते लग्नाच्या गाठी जुळविण्यापर्यंत सोशल मीडियाचा वापर हाेतो. त्यामुळे साहजिकच घर भाड्याने घ्यायचे असेल,तर पहिल्यांदा मोबाइलवर सर्च द्यायला सुरुवात होते.
आपण अजूनही पाहतो की,फ्लॅट भाड्याने द्यायचा असेल किंवा पेईंग गेस्ट ठेवायचे असेल,तर शहरातील रस्त्यावर अनेक जाहिराती लावलेल्या असतात. त्यामध्ये अगदी रेटपासून सगळ्या गोष्टी दिल्या असतात. सोशल मीडियावर याच पद्धतीने प्रचार केला जातो. पण त्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक वैयक्तिक पातळीवर माहिती देणे. यातून एका वर्तुळात आपण पोहोचू शकतो. त्यामध्ये एकमेकांशी संबंधही निघतात. काही जण दोघांचेही परिचित असतात. त्यामुळे घर भाड्याने घेताना फार अडचण येत नाही.
मात्र,आता सोशल मीडियाचा वापर व्यावसायिक पद्धतीने सुरू झाला आहे. भाड्याने घराचा शोध घेणारे पहिल्यांदा एजंट शोधतात. पण एजंटला एक किवा त्यांच्या नियमाप्रमाणे काही महिन्याचे घरभाडे द्यावे लागते. त्यामुळे एजंट शिवाय घराच्या शोधात असलेले सोशल मीडियाचा आधार घेतात. प्रामुख्याने विद्यार्थी आणि तरुण याचा वापर करतात. याबाबत थेट घरमालकांशी संपर्क झाला तर, कमिशनची बचत होते. पण त्यामध्ये फसवणुकीची भीतीही असते.
काही सामान्य अपवाद आहेत. पण अनेकदा यामधून फसवणुकीची शक्यता असते. अनेक सोसायट्या विद्यार्थी किंवा तरुणांना फ्लॅट भाड्याने देण्यास मज्जाव करतात. त्याठिकाणी राहण्यासाठी गेल्यावर याची माहिती होते. त्यातून निष्कारण वाद वाढत जातात. सोशल मीडियावर वेगळे चित्र असते आणि प्रत्यक्षात त्या सुविधा नसतात. त्यामुळे याबाबत कोणाशी बोलायचे हा प्रश्न पडतो. अनेकदा कोणत्याही प्रकारचे कमिशन घेतले जाणार नाही असे सांगितलेले असते. परंतु, छुप्या स्वरुपात कमिशनची मागणी केली जाते. एकदा घरात राहिला गेल्यावर काही प्रश्न निर्माण झाले तर, त्याबाबत कोणाशी संपर्क साधायचा याबाबतही काही कळत नाही.
घर घेताना कमीत कमी त्रास व्हावा, पैसे वाचावेत यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. पण त्यामध्ये फसवणूक टाळायची असेल तर, सोशल मीडियावरच जरा जपूनच...