फक्त सैन्यावर विश्वास ठेवा, सैन्य तुम्हाला काम दाखवेल : लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:03 PM2018-09-11T22:03:52+5:302018-09-11T22:05:09+5:30
मृत्युची पर्वा न करता सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केले.परंतु बऱ्याच जणांनी विचारले की सर्जिकल स्ट्राईक नंतर काय साधले? सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय सैन्य काय करु शकते हे आपण जगाला दाखवून दिले.
पुणे : सर्जिकल स्ट्राईकनंतर देशाकडे आता वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही. भारत फक्त पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने थांबवत नाही किंवा समझोता एक्सप्रेस बंद करत नाही तर जर कोणी हल्ला केला तर प्रत्युत्तर सुध्दा भारताला देता येते, हे आपण दाखवून दिले. केवळ सैन्यावर विश्वास ठेवा, सैन्य तुम्हाला नक्कीच काम करून दाखवेल, असा विश्वास लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केला.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१८ व्या जयंतीनिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे घोले रस्त्यावरील नेहरु सांस्कृतिक सभागृहात थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी पेशवे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, अनिल गानू, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, उपस्थित होते. सन्मानचिन्ह, पेशवाई पगडी, २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
मराठ्यांचा इतिहास म्हणजे केवळ पानिपतची लढाई. या लढाईत मराठे हरले, एवढाच लोकांना माहिती आहे. परंतु केवळ पानिपतपर्यंत मराठ्यांचा इतिहास नाही. मराठ्यांचा संपूर्ण इतिहास जगासमोर यायला हवा असे सांगून निंभोरकर म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक ही भारतीय सैन्याची अतिशय यशस्वी मोहिम होती. बऱ्याच जणांनी विचारले की सर्जिकल स्ट्राईक नंतर काय साधले? सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय सैन्य काय करु शकते हे आपण जगाला दाखवून दिले. या मोहिमेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताला कोणी प्रश्न विचारला नाही. सर्जिकल स्ट्राईल हे सरप्राईज होते, त्यासाठीच इतकी गुप्तता पाळण्यात आली होती.
मनोहर जोशी म्हणाले, राष्ट्रवाद वाढणे ही देशाची गरज आहे. प्रत्येकाच्या अंत:करणात राष्ट्रवाद असायला हवा. जवान स्वत:च्या घराची आणि आपल्या जिवाची पर्वा न करता, प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करतात. त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित राहतो. पराक्रमाची परिसीमा म्हणजे सैन्यदलातील नोकरी आहे. शिस्त आणि राष्ट्रवाद शिकण्यासाठी सैन्यात जायला हवे.
राजेंद्र निंभोरकर यांच्या सारख्या सैन्याधिकाऱ्याचा सन्मान करणे हा माझा धर्म आहे. त्यांचा सन्मान अनेकांना स्फूर्ती देणारा आहे. आयुष्यात मोठे होण्यासाठी ध्येय लागते, ध्येय समोर ठेवूनच वाटचाल करायला हवी. आपण केवळ बोलू शकतो किंवा घुसखोरी करतो असे पाकिस्तानला माहित होते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील यंत्रणा करेल अशी मोहीम भारतीय लष्कराने केली. मृत्युची पर्वा न करता सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केले असल्याचे त्यांनी सांगितले.
भूषण गोखले म्हणाले, महाराष्ट्रापुरते संकुचित न राहता, मराठ्यांचा इतिहास संपूर्ण जगासमोर आणला पाहिजे. मराठ्यांचा पूर्ण इतिहास जगासमोर आला नाही. तरुणाईने मराठ्यांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करुन योग्य इतिहास जगासमोर आणला पाहिजे. पुण्याचे विमानतळ किंवा रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यायला हवे, यातून लोकांना प्रेरणा मिळेल. सुमेधा चिथडे यांनी सूत्रसंचालन केले. कुंदनकुमार साठे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत नगरकर यांनी आभार मानले.