अवघ्या चार तासांत खंडणीखोर जाळ्यात
By admin | Published: May 26, 2017 05:47 AM2017-05-26T05:47:20+5:302017-05-26T05:47:20+5:30
खंडणीसाठी अपहरण झालेल्या व्यक्तीची पौड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या चार तासांत सुटका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पौड : खंडणीसाठी अपहरण झालेल्या व्यक्तीची पौड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या चार तासांत सुटका केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. अमोल ज्ञानेश्वर जगताप व किरण दत्ता जगताप (दोघेही रा. माऊ, ता. मावळ, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांना बुधवारी (दि. २४) सायंकाळी विनोद पोमू जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाऊ विजयकुमार पोमू जाधव याचे लवासा येथून अपहरण झाले आहे. भावाला सोडविण्यासाठी आरोपी ५ लाख रुपयांची खंडणी मागत असल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपनिरीक्षक सोनवणे यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पैसे घेण्यासाठी उरावडे रस्त्यावर येणार असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस कर्मचारी जय पवार, नाना मदने, सुहास सातपुते, संपत मुळे, संदीप सपकाळ, मयूर निंबाळकर यांनी सापळा रचला. रात्री नऊ वाजता आरोपी आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व विजयकुमार जाधव याची सुटका केली. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उद्धव
खाडे व उपनिरीक्षक वैभव सोनवणे करीत आहे.