क्रीडा विद्यापीठाच्या नुसत्या उठाबश्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:17+5:302021-07-01T04:09:17+5:30
प्रस्तावित क्रीडा विद्यापीठासाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाची पाहणी क्रीडामंत्र्यांनी केली. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यात विद्यापीठ सुरू करण्याच्या दिशेने ...
प्रस्तावित क्रीडा विद्यापीठासाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाची पाहणी क्रीडामंत्र्यांनी केली. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यात विद्यापीठ सुरू करण्याच्या दिशेने वेगात सुरुवात झाली नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, आजपर्यंतच्या परिस्थितीचा विचार करता क्रीडा विकासासाठी गेल्या अनेक वर्षांमध्ये कोणतेही विशेष प्रयत्न झाले नाहीत. हे सत्य नाकारता येणार नाही. यासाठी राज्याचे क्रीडा धोरण, शालेय पातळीवर दिले जाणारे शारीरिक शिक्षण, शाळांमध्ये दिले जाणारे क्रीडा प्रशिक्षण या मुद्द्यांचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे.
राज्य सरकारने १९९६ मध्ये देशातील पहिले क्रीडा धोरण जाहीर केले. क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानंतर २००१ आणि २०१२ अशी दोन क्रीडा धोरणे जाहीर करण्यात आली. खेळ, खेळाडूंना प्रोत्साहन, मैदाने तयार करणे, मैदानांसाठी राखीव निधी, सकस आहार, स्पर्धांचे आयोजन, शाळा-महाविद्यालयांमध्ये खेळाडूंना सवलत अशा अनेक उपाययोजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, प्राथमिक पातळीवर मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे किंवा त्या प्रकारचे वातावरण निर्माण करण्याकडे दुर्लक्षच झालेले दिसते. संस्थात्मक पातळीवर खेळांना मान्यता देण्यात भिन्नता आढळते. त्यामुळे एखाद्या शाळेत फुटबाॅल खेळाची आवड असणारे अनेक विद्यार्थी असले तरी त्यांना खेळण्यासाठी शाळेची परवानगी मिळेलच असे नाही. या त्रुटी दूर केल्याशिवाय क्रीडा धोरण अपूर्ण आहे.
१९९६ च्या क्रीडा धोरणात शारीरिक शिक्षणाची गरज आणि महत्त्व विशद करण्यात आले आहे. मात्र, आजही शारीरिक शिक्षणात नियमितता आढळून येत नाही. ईयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रकात क्रीडा विषयासाठी आठवड्याला किमान पाच तासिका असाव्यात अशी शिफारस करण्यात आली होती. त्या तासिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि त्याद्वारे खेळात रुची निर्माण करणे अपेक्षित आहे. मात्र, शालेय पातळीवर तसा प्रयत्न होताना दिसत नाही. शालेय पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत होणाऱ्या राजकारणाचाही परिणाम क्रीडा क्षेत्रावर झाला आहे. अनेक होतकरू खेळाडूंना त्यामुळे मैदान सोडावे लागले. अशा अनेक समस्या असताना राज्यात क्रीडा विद्यापीठाची चर्चा सुरू झाली आहे.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल १५६ एकरात पसरलेले आहे. विद्यापीठासाठी आणखी विस्तारित जागेची आवश्यकता आहे. मात्र, त्याबाबतीत सरकारकडे अद्याप कोणतेही नियोजन नाही. क्रीडा संकुलातील अनेक मैदानांच्या दुरुस्तीची गरज आहे. त्याकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरु कोण असतील याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. लवकरच तीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यादृष्टीने प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली नाही. क्रीडा संकुलाची दुरुस्ती केल्यानंतर, काही वर्षांनी सर्व अभ्यासक्रम एकत्र सुरू करावे असे क्रीडा मंत्र्यांना वाटत नाही. त्यांचे नियोजन कसे असेल, प्राध्यापक भरती, कर्मचारी भरती अद्याप झालेली नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असताना केवळ क्रीडा विद्यापीठाची घोषणा करून मोकळे होणे म्हणजे क्रीडा विद्यापीठाच्या नावाने उठाबश्या काढण्यासारखेच आहे.
अनेक प्रश्न अनुत्तरित
- प्रवेशप्रक्रिया कधी सुरू करणार?
- अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड कशी होणार?
- विद्यापीठासाठी अतिरिक्त जागा कशी व कधी उपलब्ध होणार?
- कुलगुरुंची निवड कधी करणार?
- क्रीडा संकुलाची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष होत असताना विद्यापीठाचा पांढरा हत्ती कसा जोपासणार?
- क्रीडा विद्यापीठ की राजकीय घोषणाबाजी?
- उमेश जाधव