बस-टेम्पोची धडक; दोन्ही वाहने जळून खाक
By admin | Published: October 23, 2015 12:08 AM2015-10-23T00:08:38+5:302015-10-23T00:08:38+5:30
बस व टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. सुमारे तासभर या गाड्या रस्त्याच्या मधोमध पेटत उभ्या होत्या. त्यामध्ये दोन्ही वाहने जळून खाक झाली
पेठ : बस व टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. सुमारे तासभर या गाड्या रस्त्याच्या मधोमध पेटत उभ्या होत्या. त्यामध्ये दोन्ही वाहने जळून खाक झाली असून गाड्यांचे आता फक्त सांगाडेच उरले आहेत. ही घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ गावच्या हद्दीत बुधवारी रात्री ११ वाजता घडली.
या अपघाताची तिव्रता एवढी होती की, दोन्ही गाड्यांची धडक होताच क्षणातच त्यांनी पेट घेतला. गाड्या पेटल्यामुळे पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतूक पेठ गावातून जाणाऱ्या रस्त्याने वळविण्यात आली. घडलेल्या अपघातात अमोल मारुती मुळे, बस चालक दिलीप बजाबा पवार (दोघे रा.मांजरवाडी) व अमित अर्जुन खोकराळे (रा.हिवरे तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंचर येथे एका खासगी दवाखान्यात औषध उपचार सुरु आहेत. टेम्पो चालकाचे नाव समजू शकले नाही.
पेठ गावाजवळ पुणे - नाशिक महामार्गावर बुश कंपनीचे कामगार चाकणला नेणाऱ्या बसला (एम. एच. १४, सी. डब्लू. २८७६) राजगुरुनगरहून भरधाव आलेल्या टेम्पोची धडक बसली. त्यामुळे दोन्ही वाहनांनी पेट घेतला. अपघातात बसमध्ये अडकलेल्या बसचालकास बाहेर पडण्यासाठी तेथे थांबलेल्या ग्रामस्थांनी मदत केली. मात्र नंतर आगीची तिव्रता एवढी वाढली की कोणालाही ती आग विझवता येणे शक्य झाले नाही.
ही घटना मंचर पोलिसांना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे, सहाय्यक फौजदार आय. ए. सय्यद व इतर पोलिस घटनास्थळी आले. तिन्ही जखमींना मंचर येथे उपचारासाठी दाखल केले.