नुसतेच फिरण्यापेक्षा जरा जपूया ना ‘इको’ टूरिझम ..!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 07:00 AM2018-09-27T07:00:00+5:302018-09-27T07:00:00+5:30
दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून दोन घटका निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास तरुणाई प्राधान्य देत आहे.
पुणे : दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून दोन घटका निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास तरुणाई प्राधान्य देत आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून टूरिझमची क्रेझ वाढली असून वेगवेगळ्या माध्यमातून निसर्गाच्या सहवासात राहण्याची संधी पर्यटक घेत आहेत. वरकरणी हे चित्र जरी सुखावणारे असले तरी पर्यटनाच्या निमित्ताने अति व्यावसायिकवृत्तीमुळे पर्यटनस्थळांची हानी होत असल्याचे दिसून येत आहे.तसेच निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यापेक्षा त्या निसर्गाविषयीची संवेदनशीलता पर्यटक लक्षात घ्यायला तयार नाहीत. तेव्हा तरुणांनो जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने इको टूरिझम जपण्याचा निर्धार करुया..
दर शनिवार- रविवारी एखाद्या मॉलमध्ये पूर्ण दिवस घालविणारी तरुणाई आता घराचा उंबरा ओलांडून निसर्गात जाऊ लागली आहे. हल्ली लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता, निसर्गाच्या अभ्यासाकरिता, याबरोबरच टेÑकिंगसाठी पर्यटन करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये टुरिझमची क्रेझ असली तरी त्याबरोबरच काही महत्वकांक्षी व्यावसायिकांच्या धोरणाचा फटका निसगार्ला बसत आहे. याविषयी अधिक माहिती देताना पुरातत्व व पर्यावरण विषयाच्या अभ्यासक तसेच संशोधनाकरिता नेहमीच भटकंती करणा-या साईली पलांडे - दातार यांनी सांगितले, इतिहासाचा वारसा समजून घेण्याकरिता, विविध महोत्सव अभ्यासण्याच्या निमित्ताने आणि वेगवेगळ्ता गावांमधील यात्रा उत्सवाचा आनंद घेण्याच्या औचित्याने भटकंती करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यावेळी त्या पर्यटनस्थळी स्थानिकांना रोजगार मिळणे हे जरी स्वाभाविक असले तरी दुसरीकडे अतिव्यावसायिक दृष्टीकोनातून पर्यटकांची लूट होताना दिसते. विषय केवळ व्यावसायिकतेचा नसून पर्यटकांच्या बदलत्या मानसिकतेचा देखील आहे. आजकाल वाढत्या माध्यमांमुळे संबंधित पर्यटनस्थळांविषयीची माहिती तात्काळ उपलब्ध होते. पध्दतशीर नियोजन करुन तिथे भेट दिली जाते. परंतु पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेण्यापेक्षा इतर गोष्टींमध्येच अधिक रमताना दिसतात. यात सर्वाधिक वेळ ते सेल्फीमध्ये घालवतात. स्वयंशिस्तीच्या अभावामुळे त्यांना अनेकदा विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.
शासकीय यंत्रणेने काही संस्था स्थापन करुन आपली जबाबदारी झटकल्याचे पाहवयास मिळते. शासनाच्या त्या पर्यटन संस्थांकडून केवळ हॉटेलिंगचीच माहिती मिळते असा अनुभव पर्यटकांचा आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळाल्यास त्याचा फायदा संबंधित गाव व जिल्हयाला मिळत असला तरीदेखील कुचकामी सरकारी यंत्रणेमुळे काही खासगी व्यावसायिकांची अरेरावी पर्यटनस्थळांवर दिसून येते. गेल्या काही वर्षांमध्ये इको टूरिझमची संकल्पना वाढीस लागली असताना त्या संकल्पनेचे योग्य व्यवस्थापन नसल्याने सध्या पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
* पर्यटकांनो काय काळजी घ्याल?
- अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची हुल्लडबाजी दिसून येते. जे पर्यटनस्थळ पाहण्यासाठी गेलो आहोत त्याचा आदर राखणे गरजेचे आहे
- आपण फिरण्यासाठी आलो आहोत की इतरांना त्रास देण्याकरिता याचे भान पर्यटकांनी राखावे
- साहसीपणाचा अतिरेक जास्त झाल्याने अपघाताचा धोका वाढतो. हे लक्षात घेवून भटकंती करावी.
- फिरण्याकरिता ज्या ठिकाणी जात आहोत तेथील स्थानिकांना सहकार्य करण्याची भावना ठेवावी.
* कास चा अट्टाहास कशाला?
सातारा जिल्हयातील कास पठारावरील फुलांचा महोत्सव पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. गेल्या काही वर्षांपासून कासचा ब-यापैकी प्रचार-प्रसार झाल्याने त्याविषयी पर्यटकांना कुतूहल असते. मात्र त्याठिकाणी सध्या वाढत जाणा-या पर्यटकांच्या संख्येमुळे दहा वर्षांपूर्वी फुलणारी फुले आता फुलताना दिसत नाही. नाशिक -गोवा दरम्यान असणा-या पठारांवर देखील वेगवेगळी फुलं फुलतात. मात्र, त्याविषयी पर्यटकांना माहिती नसल्याचे साईली सांगतात.