ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान; मानधन कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:24+5:302021-03-24T04:11:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात झालेल्या ६४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तब्बल १३ हजार ४१७ अधिकारी, कर्मचा-यांनी ...

Just respect in Gram Panchayat elections; When will the honorarium be received? | ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान; मानधन कधी मिळणार ?

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान; मानधन कधी मिळणार ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात झालेल्या ६४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तब्बल १३ हजार ४१७ अधिकारी, कर्मचा-यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून दिवस रात्र निवडणुकीचे, मतमोजणीचे काम केले. परंतु तीन महिने लोटले तरी या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे मानधन मिळाले नाही.

कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात आल्या. जिल्ह्यात एकूण ६४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून अर्जांची छाननी, अर्ज माघारी आणि चिन्ह वाटप प्रत्येक वेळी ग्रामपंचायतींची संख्या अधिक असल्याने मोठी गर्दी होती. यासाठी जिल्ह्यातील तब्बल १३ हजार ४१७ कर्मचारी दिवस रात्र काम करत होते. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी खर्च देखील प्रचंड होता. जिल्ह्यात ६४९ ग्रामपंचायतीसाठी तब्बल ६ कोटींचा प्रशासकीय खर्च आला. हा प्रशासकीय खर्चच अद्याप शंभर टक्के मिळाला नसून, मानधनासाठीचा निधी तर एक रुपया देखील आला नाही.

-------

जिल्ह्यात निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती - ६४९

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले अधिकारी - २६३

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले कर्मचारी - १३१५४

--

तालुकानिहाय आढावा

तालुका ग्रामपंचायती अधिकारी-कर्मचारी

भोर ६३ ९१३

वेल्हा २० २७०

पुरंदर ५५ ११००

इंदापूर ५७ १४९६

बारामती ४९ १०६७

मावळ ४९ ८३१

जुन्नर ५९ ११५१

आंबेगाव २५ ५०६

हवेली ४५ ११६१

दौंड ४९ १३०४

मुळशी ३६ ७७६

खेड ८० १३४२

शिरूर ६२ १४९६

एकूण ६४९ १३४१७

--------

प्रशासकीय खर्चच मिळेना मानधन कधी मिळणार

जिल्ह्यातील ६४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय खर्च तब्बल ६ कोटींच्या घरात गेला आहे. हा प्रशासकीय खर्चांपैकी पन्नास टक्केच निधी आता पर्यंत मिळाला आहे. यामुळे तब्बल १३ हजार ४१७ निवडणुकीचे काम केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधन कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Just respect in Gram Panchayat elections; When will the honorarium be received?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.