गुटखाबंदी उरली नावापुरतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:58 AM2017-07-19T03:58:44+5:302017-07-19T03:58:44+5:30

गुटखाबंदीच्या पाच वर्षांत गुटख्याची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यात अन्न आणि औषध प्रशासनाला (एफडीए) सपशेल अपयश आले असून, शहरात अगदी

Just for the sake of gutkha | गुटखाबंदी उरली नावापुरतीच

गुटखाबंदी उरली नावापुरतीच

Next

- विशाल शिर्के । लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गुटखाबंदीच्या पाच वर्षांत गुटख्याची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यात अन्न आणि औषध प्रशासनाला (एफडीए) सपशेल अपयश आले असून, शहरात अगदी सहजच गुटखा मिळत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. पोलीस आणि एफडीए प्रशासनाचा साधा धाकही नसल्याने, बहुतांश पानटपरीवर सर्रास गुटख्याची विक्री केली जात असल्याचे दिसून आले.
राज्य सरकारने २० जुलै २०१२ पासून राज्यात गुटखाबंदी लागू केली. मात्र, उत्पादकांनी पळवाटा काढत दोन पुड्यांचे मिश्रण आणले. सुगंधित तंबाखू मिश्रणाच्या माव्याचे आणि खर्ऱ्याचेदेखील बाजारात पेव फुटले. त्यानंतर सरकारने या सर्व पदार्थांवरही बंदी घातली. या बंदीला गुरुवारी
(दि.२०) पाच वर्षे पूर्ण होत आहेत. देशातील २६ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशात गुटखा आणि पानमसाला विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही, राज्यात गेल्या ५ वर्षांत १०६ कोटी रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून, त्यात पुणे विभागातील २३ कोटी ५३ लाख रुपयांच्या साठ्याचा समावेश आहे.
पोलिसांसह एफडीए प्रशासनाने कोट्यवधींचा गुटखा पकडला असून, शेकडो व्यक्तींवर खटले दाखल केले आहेत. त्यानंतरही पुरवठादार आणि विक्रेत्यांचे रॅकेट उद्धवस्थ करण्यात त्यांना यश आलेले नाही. शहरात कर्नाटक आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे तयार झालेला ‘उँची पसंद’ असलेल्या लोकांसह इतर ब्रँडचा गुटखाही आढळून येत आहे. त्यातही रंगीत पुडी असलेल्या गुटख्याचे प्रमाण अधिक आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने लॉ कॉलेज ते औंध येथील एफडीए कार्यालयादरम्यानचा रस्ता आणि त्यावरील पानटपऱ्यांची पाहणी केली. तीनपैकी दोन पान टपऱ्यांवरून रंगीत पुडीतील मिश्र गुटखा मिळाला. चतु:शृंगी परिसरातील दोन टपऱ्यांवर लहान पुडीसाठी १२ आणि मोठ्या पुडीसाठी १५ रुपये घेण्यात आले. त्यावर अनुक्रमे पाच आणि १२ रुपये छापील किंमत असून, कर्नाटकातील टुमकुर येथे बनविण्यात आल्याचा पुडीवर उल्लेख आहे. सध्या १२ रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत गुटख्यासाठी पैसे आकारण्यात येत आहे. परवडणारी असल्याने लाल पुडीतील १२ ते १५ रुपयांच्या गुटख्याला पसंती आहे. उँची पसंदवाला गुटखा महाग असल्याने त्याची विक्री कमी होत असल्याचे दिसून आले.

अवैध गुटखा बाजारात
नळस्टॉप चौकापासून औंध येथील एफडीए कार्यालयादरम्यान सरासरी ५० मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या नाहीत, असे झाले नाही. तसेच या दरम्यानच्या जवळपास प्रत्येक पानटपरी बाहेर गुटख्याच्या रिकाम्या पुड्या आढळून आल्या. तिच स्थिती फर्ग्युसन रस्ता, मराठवाडा कॉलेज परिसर, डेक्कन, सदाशिव पेठ, टिळक रस्ता, मंडई या भागातही दिसून आली. शहरातील रस्त्यावरील कचऱ्यावर जरी नजर टाकली तरी याची प्रचिती प्रत्येकाला येईल. तसेच, त्यावरूनच कोणत्या ब्रँडचे प्रस्थ खाणाऱ्यांमध्ये जास्त आहे, ते देखील आढळून येईल. पूर्वीच्या कंपन्यांच्या नावाचा वापर करून अवैधरित्या गुटखा तयार करण्यात येत असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

निर्यातीचा गुटखाही उपलब्ध
‘केवळ निर्यातीसाठी’ असे लिहिलेला ‘उँची पसंदवाल्यां’चा गुटखादेखील शहरात सर्रास मिळत आहे. एकूण जप्त मालापैकी निर्यातीसाठी, असे नमूद केलेल्या गुटख्याचे प्रमाण ५ ते १० टक्के इतके आहे. इतर, रंगीत आणि पांढऱ्या रंगाची पुडी असलेल्या इतर ब्रँडचा गुटखादेखील मिळत आहेत. सध्या रंगीत पुडीच्या गुटख्याचे शहरात पेव असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले.

गुटखा तपासणीची विशेष मोहीम
‘लोकमत’ प्रतिनिधीने एफडीएचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांची भेट घेऊन, संबंधित पाहणीची माहिती दिली. त्यावर त्यांनी कमीत कमी मनुष्यबळावर अधिकाधिक कारवाई करीत असल्याचे सांगितले. पंढरपूरला राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत एकाच दिवशी ३८ लाख रुपयांचा साठा जप्त केल्याचे ते म्हणाले. तसेच, मंगळवारी (दि.१८) केलेल्या कारवाईत लोणी काळभोर येथून दीड लाखांचा तर, कोंढव्यातून १३ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांत पुणे विभागात ५ हजार १७ पानटपऱ्या आणि दुकानांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील
१ हजार ६४३ जणांकडून गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे. एफडीए कायद्यानुसार ८१९ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, ९८१ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल २३ कोटी ५३ लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
- शिवाजी देसाई,
सहआयुक्त एफडीए, पुणे विभाग -

पुणे विभागात गेल्या पाच वर्षांत पाच गुटख्यांच्या अवैध कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात भोर तालुक्यातील दोन, सांगलीतील एक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे. हे कारखाने शेतात अथवा गोठ्यात उभारण्यात आलेले होते.

Web Title: Just for the sake of gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.