"नुसतंच बाळासाहेबांचे विचार"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 02:59 PM2023-11-28T14:59:16+5:302023-11-28T15:19:57+5:30
महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शासनाचा धाकच राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले.
पुणे - राज्यातील दुकाने आणि आस्थापना यावरील पाट्या मराठी भाषेत ठळक अक्षरात लावा, सरकारच्या कायद्याचे पालन करा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यासाठी, व्यापारांना २ महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत संपूनही अनेक दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या नाहीत. त्यामुळे, काही शहरांत मनसेने आक्रमक पवित्रा घेत काहीठिकाणी पाट्या फोडल्या. याच संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राज यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शासनाचा धाकच राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील मराठी पाट्यांसदर्भात मुंबई, ठाण्यासह पुणे जिल्ह्यात मनसैनिक आक्रमक झाले आहेत. ज्या दुकानांवर मराठी बोर्ड दिसत नाही, तिथे खळखट्याक करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंनी थेट नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आले होते, त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राज यांनी राज्य सरकारचा धाक उरला नाही, असे म्हटले. तसेच, मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं काम हे सरकार करत असल्याचा टोलाही लगावला.
मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायला आपलं सरकार आहे. नुसतं बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार बोलायला आहेत. कोर्टाने सांगूनही सरकारला मराठी पाट्यांची सक्ती करता येत नाहीत. ज्यावेळी मी मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले होते, तेही काढता आले नाहीत. नुसतं बोलायचे बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना, असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
ज्यावेळी, आम्ही मराठी पाट्यांचं आंदोलन केलं होतं तेव्हा मराठीत पाट्या लागल्या होत्या ना. आता, शासनाचा धाक नावाची काही गोष्ट आहे की नाही. कोर्टाची भीती नाही, पोलिसांची भीती नाही, शासनाची भीती नाही. मग, आपण अराजकाकजे जाऊ, असे म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.