अवघ्या बारा पावलांनी ‘हुकवले’ आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:25+5:302021-01-23T04:10:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी (दि.२१) लागलेल्या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी (दि.२१) लागलेल्या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दुर्दैवाची बाब अशी की, हे पाचही मृतदेह जिथे सापडले तिथून अवघ्या बारा पावलांवर त्याच मजल्यावरून खाली उतरण्यासाठीचा मार्ग होता. परंतु, कदाचित दाटलेल्या प्रचंड धुरामुळे त्यांना हा मार्गच दिसू शकला नसावा किंवा धुरामध्ये हे पाचही जण गुदमरले गेले असावेत. हा मार्ग जर त्यांना वेळेत दिसला असता तर कदाचित या पाचही जणांचे प्राण वाचले असते.
सिरममधील आगीत प्रतीक पाष्टे (एरंडवणे), महेंद्र इंगळे (नऱ्हे), रमा शंकर हरीजन, बिपीन सरोज (दोघेही रा. उत्तर प्रदेश), सुशील कुमार पांडे (बिहार) या पाच जणांना जीव गमवावा लागला. हे पाचही जण अन्य सहकारी कामगारांसोबत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काम करीत होते. काम सुरू असतानाच अचानक आग लागल्याची ओरड उठली. अवघ्या काही क्षणातच आगीने या मजल्याला कवेत घेतले.
इमारत बंदिस्त असल्याने कुठून बाहेर पडावे हे कामगारांना कळत नव्हते. यातील काही जण टेरेसवर चढले. तर, काही जणांनी उड्या मारून स्वत:चे प्राण वाचविले. जीव वाचविण्यासाठी धावलेले हे पाचही जण एका कोपऱ्यात जाऊन उभे राहिले. धुरामुळे त्यांना श्वास घेता येणे शक्य होत नव्हते. धुरामुळे अगदी हातावरचेही दिसू शकत नव्हते. हे पाचही जण ज्या ठिकाणी उभे होते; तेथून अवघ्या बारा पावलांवर बाहेर पडण्याचा मार्ग होता. याठिकाणी जिना आणि ‘एक्झिट’ मार्ग होता. या जिन्याने कामगार खाली उतरून सुखरूप बाहेर पडू शकले असते. पण तसे घडले नाही.