मावळ तालुक्यातील जाधववाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील शेतकऱ्यांना न्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 05:45 PM2019-07-24T17:45:57+5:302019-07-24T17:51:27+5:30
१९९७ साली जाधववाडी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने सिलिंग लावण्याचे धोरण निश्चित केले होते..
पुणे : मावळ तालुक्यातील जाधववाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील शेतकऱ्यांना आता न्याय मिळाला असून १६०० हेक्टर पेक्षा अधिक जमिनीवरील सिलिंग रद्द ( लाभ क्षेत्रावरील शेरे वगळणे ) करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील इंदोरी, जांभवडे व खेड तालुक्यातील कान्हेवाडी तर्फे चाकण, येलवाडी, सांगुर्डी, खालूंब्रे या गावातील प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
१९९७ साली जाधववाडी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने सिलिंग लावण्याचे धोरण निश्चित केले, त्यानंतर शेतकरी सातत्याने त्यांच्या हक्काच्या जमिनीवरचे सिलिंगचे शेरे रद्द करण्यासाठी प्रयत्न करत होते.
राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांनी मंगळवारी मुंबई मंत्रालय येथे याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, कृष्णा खोरे विभागाचे कार्यकारी संचालक जाधव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी पुणे भारत वाघमारे, अधिक्षक अभियंता चोपडे, ज्येष्ठ नेते संभाजीराव पवार, माजी सरपंच हेमलताताई मोरे, नवनाथ पवार, उमेश मोरे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून तेथील शेतकऱ्यांची ही मागणी होती. त्यास जलसंपदा मंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनी या निर्णयाबद्दल दोन्ही मंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
======================