अखेर ‘डॉन’ ला न्याय; लॅम्बोर्गिनी कारचालकाला अटक, महागडी गाडीही जप्त
By श्रीकिशन काळे | Published: August 13, 2023 04:15 PM2023-08-13T16:15:11+5:302023-08-13T16:15:32+5:30
लॅम्बोर्गिनी कारचालकाने डेक्कन येथील गुडलक चौकात डॉन नावाच्या श्वानाला उडवले होते
पुणे : महागडी गाडी वेगाने चालवून डेक्कन येथील गुडलक चौकातील डॉन नावाच्या श्वानाला फरपटत नेऊन मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अखेर अटक केली आहे. कोट्यवधी रूपयांची लॅम्बोर्गिनी गाडी तो चालवत होता. त्याने श्वानला धडक देऊन फरपटत नेले होते. त्याच्याविरोधात प्राणीप्रेमींनी पोलीसांत तक्रारही दिली होती. त्याच्यावर आता गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आणि त्याची महागडी गाडीही जप्त केली आहे. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त देऊन त्याविषयी आवाज उठवला होता.
डेक्कन परिसरात दोन वर्षांपूर्वी एकाने लॅम्बोर्गिनी ही सुपर कार विकत घेतली. तेव्हापासून तो ती अतिशय वेगाने चालवत होता. त्यामुळे इतरांना धोका होऊ नये म्हणून दोन वर्षांपूर्वीदेखील डेक्कन परिसर समितीने याविषयी आवाज उठवला होता. परंतु, त्यावर काहीच कारवाई झाली नव्हती. नुकतेच त्याने गोपाळ कृष्ण गोखले चौकात (गुडलक चौक) डॉन नावाच्या श्वानाला फरपटत नेले होते. हे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील रेकॉर्ड झाले होते. त्याचे फुटेज प्राणीप्रेमीने पोलिसांना दिले होते. त्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मनसेचे नेते वसंत मोरे यांनी देखील या कारचालकाविरोधात आवाज उठवला होता. डेक्कन परिसर समितीच्या डॉ. सुषमा दाते यांनी त्या वाहनचालकाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. अखेर आज त्या कारचालकाला अटक केली असून, त्याची गाडीही जप्त केली आहे.
आज सायंकाळी ५ वाजता श्रध्दांजली सभा
प्राणीप्रेमींच्या वतीने रविवारी सायंकाळी ५ वाजता गुडलक चौकामध्ये डॉन या श्वानाला श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यावेळी मनसेचे नेते वसंत मोरे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच ॲनिमल स्नेक सोसायटीचे अध्यक्ष आनंद अडसुळ व त्यांचे कार्यकर्ते, डेक्कन समिती परिसरचे सदस्य या वेळी श्रध्दांजली अर्पण कणार आहेत.