अपेक्षाला न्याय मिळालाच पाहिजे; नराधमाला फाशी झालीच पाहिजे, राजगुरुनगर ग्रामस्थांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:32 IST2025-04-16T12:30:31+5:302025-04-16T12:32:10+5:30
नवनाथ मांजरे या नराधमाने अपेक्षाला गाडीवर बसून शेतात नेऊन बलात्कार केला, त्यानंतर तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला

अपेक्षाला न्याय मिळालाच पाहिजे; नराधमाला फाशी झालीच पाहिजे, राजगुरुनगर ग्रामस्थांची मागणी
राजगुरूनगर: खेड तालुक्यातील मांजरेवाडी (धर्म ) ता खेड ) येथील अपेक्षा वसंत मांजरे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अमानुषपणे दगड डोक्यात घालून खून केल्याप्रकरणी या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. आरोपीला जलद गती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा होण्यासाठी मांजरेवाडी ग्रामस्थांनी कॅण्डल मोर्चा काढला होता.
आरोपी नवनाथ कैलास मांजरे ( वय २९ रा मांजरेवाडी धर्म ता खेड ) या नराधमाने अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलीला गाडीवर बसून शेतात नेऊन बलात्कार केला. तसेच तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीच्या पाण्यात टाकला.या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध म्हणून राजगुरूनगर शहरातील हुतात्मा राजगुरू, भगतसिंह, सुखदेव यांच्या स्मृतिस्थळापासून मांजरेवाडी धर्म, मांजरेवाडी पिंपळ, मलघेवाडी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी तहसिलदार कचेरीपर्यत कॅन्डल मार्च मोर्चा काढला. कुटुंबियांच्या व ग्रामस्थांच्या वतीने या आरोपीला जलद गती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा होण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांना निवेदन देण्यात आले. या कामी पोलीस प्रशासनाच्या वतीने तपासामध्ये कुठल्याही प्रकारची कुसुराई न ठेवता योग्य व न्यायिक पद्धतीने तपास होऊन नराधमाला फाशीच होईल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील विजय डोळस, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी राक्षे,विजयाताई शिंदे , अश्विनी पाचारणे, वंदना सातपुते शहरातील विविध संस्थांच्या महिला यावेळी उपस्थित होत्या. पंचक्रोशीतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर नराधम आरोपी संशयित म्हणून पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर खुनाची कबुली दिली. मात्र अत्याचार संदर्भात पोलिसांची दिशाभुल करत असल्यामुळे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने बलात्कार करुन खुन केल्याचे समोर आल्याने ग्रामस्थ महिला आक्रमक झाल्या होत्या.