बाल न्यायमंडळ आज निकाल देण्याची शक्यता; उच्च न्यायालयाने ओढले होते पुणे पोलिसांवर ताशेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 10:14 AM2024-06-25T10:14:30+5:302024-06-25T10:15:12+5:30
कल्याणीनगर येथे १९ मे रोजी पहाटे ‘पोर्शे कार भरधाव चालवून दुचाकीस्वार तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या अल्पवयीन कारचालकाला सुरुवातीला तीनशे शब्दांच्या निबंध लेखनासह विविध अटींवर बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला...
पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी अर्ज का दाखल केला नाही, जामिनानंतरही मुलाला कैद करण्याचे कारण काय, मुलाला बालनिरीक्षण गृहातच बंदिस्त करण्यात आले आहे, हा बंदिवास नाही का, असे सवाल उपस्थित करून मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलासंदर्भात पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले होते. याबाबतचा निकाल बाल न्याय मंडळ मंगळवारी (दि. २५) देणार आहे. मुलाचा जामीन रद्द केला जाणार, की त्याला नातेवाइकांच्या ताब्यात दिले जाणार, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कल्याणीनगर येथे १९ मे रोजी पहाटे ‘पोर्शे कार भरधाव चालवून दुचाकीस्वार तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या अल्पवयीन कारचालकाला सुरुवातीला तीनशे शब्दांच्या निबंध लेखनासह विविध अटींवर बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला. त्यावर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्यावर बाल न्याय मंडळाने आदेशात दुरुस्ती करून या मुलाची रवानगी ५ जूनपर्यंत बालनिरीक्षण गृहात केली. नंतर मुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव १२ जूनपर्यंत आणि त्यानंतर २५ जूनपर्यंत सुधारगृहातील मुक्काम वाढविला. मुलाचा सुधारगृहातील मुक्काम मंगळवारी संपत आहे. काही दिवसांपूर्वीच पोर्शे अपघाताचा सखोल तपासणी अहवाल पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे सादर केला आहे. त्यामुळे बाल न्याय मंडळ अल्पवयीन मुलाबाबत काय निर्णय देते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या मावशीने उच्च न्यायालयात हेबियर्स कोपर्स याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले होते.
मुलाचा ताबा कुणाकडे जाणार ?
बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा अग्रवाल कुटुंबीयांचे कौटुंबिक मित्र असलेल्या एका कुटुंबाकडे द्यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी मंडळात दाखल केला आहे. हे कुटुंबीय अग्रवाल राहत असलेल्या परिसरातच राहायला आहे. मंडळातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा कोणाकडे द्यायचा आहे, त्यांची नावे द्यावीत, अशी सूचना मंडळाने मुलाच्या कुटुंबीयांच्या वकिलांना केली आहे. मुलाचा त्याचा रक्ताच्या नात्यातील सदस्यांकडे ताबा देता येणार नाही. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीची नावे द्यावीत, असे मंडळाने सूचित केले होते. त्यानुसार ही नावे देण्यात आली आहेत.