बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 06:49 AM2024-05-22T06:49:34+5:302024-05-22T06:50:01+5:30
आम्ही मुलाच्या पार्टीचे, गाडीचे पुरावे दिले हाेते, तरीही निर्णय आश्चर्यकारक लागला. बालन्याय मंडळाची भूमिका सरकारच्या आणि लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असेही फडणवीस म्हणाले. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन फडणवीस यांनी स्वत: पुण्यात येत पोलिस विभागाची बैठक घेतली.
पुणे : कल्याणीनगर येथील ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात पोलिसांकडून कडक कारवाई करून ३०४ कलम लावले होते. आरोपीला सज्ञान म्हणून कारवाई करण्यास परवानगी आणि पोलिस कोठडी मिळावी, असा बालन्याय मंडळाकडे अर्ज केला होता. मात्र, बालन्याय मंडळाने अर्ज फेटाळत जामिनाचा निर्णय घेतला. ताे पोलिसांसाठी धक्कादायक होता, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
आम्ही मुलाच्या पार्टीचे, गाडीचे पुरावे दिले हाेते, तरीही निर्णय आश्चर्यकारक लागला. बालन्याय मंडळाची भूमिका सरकारच्या आणि लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असेही फडणवीस म्हणाले. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन फडणवीस यांनी स्वत: पुण्यात येत पोलिस विभागाची बैठक घेतली.
बालन्याय मंडळ फेरविचार करेल
पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली. कायद्यानुसार, बालन्याय मंडळाच्या आदेशावर फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते आणि त्यांनी फेरविचार केला नाही तर वरच्या न्यायालयात दाद मागता येते.
त्यामुळे कायद्यानुसार, ती कारवाई करण्यात येत आहे. निश्चितपणे बालन्याय मंडळ फेरविचार करेल, अशी आम्हाला खात्री आहे, असेही फडणवीस म्हणाले.
ग्राहकांच्या पिण्यावर नियंत्रण आणा -
‘पबमध्ये ज्या ग्राहकांना अल्कोहोल दिले जाते, त्यानंतर ग्राहक काय करतात, यासाठी तुम्हीही जबाबदार आहात. क्लबमध्ये येणारे घरी चालत जातीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे अशा ग्राहकांच्या पिण्यावर मर्यादा घाला किंवा त्यांच्यासोबत ड्रायव्हर असल्याची खात्री करा. काहीच नसेल तर क्लबच्या आवारातच त्यांना झोपायला सांगा.’ अशा शब्दांत सत्र न्यायालयाने मंगळवारी बारमालकांना फटकारले.
‘त्यांना’ चार दिवसांची पोलिस कोठडी
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला मद्यविक्री केल्याप्रकरणी ‘कोझी’ हॉटेलचे मालक नमन भुतडा (२५, पद्मविलास पॅलेस, वानवडी), व्यवस्थापक सचिन काटकर (३५, रा. साईसदन, तुकाईनगर, हडपसर), हॉटेल ‘ब्लॅक’चे असिस्टंट मॅनेजर संदीप सांगळे ( ३५, रा. केशवनगर, मुंढवा) यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी दिले.