काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही; आठवलेंची राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:30 IST2025-02-25T17:29:53+5:302025-02-25T17:30:07+5:30
'त्यांनी किती मर्सिडीज गाड्या दिल्या आहेत हे माहीत नाही. परंतु काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही'

काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही; आठवलेंची राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया
इंदापूर : 'त्यांनी किती मर्सिडीज गाड्या दिल्या आहेत हे माहीत नाही. परंतु काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही 'अशा शब्दांत नीलम गोऱ्हे विरुध्द संजय राऊत प्रकरणासंदर्भात केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. सोलापूरहून मुंबईकडे जाताना सोमवारी (दि.२४) सायंकाळी आठवले हे काही काळ येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आठवले म्हणाले की, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे समाजवादी कार्यकर्त्या म्हणून पुढे आल्या. त्यांनी काही वर्षे रिपाइंचे काम केले आहे. शिवसेनेत ही काम केले. त्याना तेथे चार वेळा आमदार केले. आता त्या शिंदेसेनेत आहेत. काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही असे म्हणत त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.
लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता
विवाह सोहळ्याच्या निमित्त एकत्र आलेले उद्धव ठाकरे व राज ठाकरे कायमस्वरुपी एकत्र येतील असे आपल्याला वाटत नाही. ते एकत्र आले तरी महाराष्ट्रात त्या दोघांची ताकद नगण्य आहे. राज ठाकरे यांच्या एवढ्या मोठ्या सभा होऊन ही त्यांचा एक माणूस निवडून येत नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा एक ही उमेदवार निवडून आला नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे दिसले नाही. दोघे एकत्र आले तरी महायुतीवर परिणाम होणार नाही, असे आठवले म्हणाले.
प्रत्येक प्रकरणाला लव्ह जिहाद म्हणू नये
लव्ह जिहाद बाबत बोलताना ते म्हणाले, अनेकदा एकमेकांची जात पात माहित नसताना मुलं मुली एकत्र येतात. एकत्र येऊन संसार थाटावा अशी त्यांची इच्छा असते. कित्येक प्रकरणात धर्म जात बाजूला ठेवून दोघे एकत्र येतात. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाला लव्ह जिहाद म्हणू नये. हिंदू मुलगी किंवा दलित मुलगी असेल व मुलगा मुस्लिम असेल तर धर्मांतर होऊ नये असे आपले मत आहे. ज्या वेळी कायदा बनेल त्यावेळी त्यात तशी तरतूद असावी. असे मत आठवले यांनी व्यक्त केले.