कबीरांचे दोहे मानवजातीला दिशा देणारे : डॉॅ. बाबा आढाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 07:05 PM2020-02-07T19:05:34+5:302020-02-07T19:06:41+5:30
‘कबीर हा तसा बहिष्कृत संत होता...
पुणे : ‘कबीर हा तसा बहिष्कृत संत होता. कारण, हिंदू त्याला आपला मानत नव्हते आणि मुस्लिम त्याला नाकारत होते. परंतु, कबीरांनी जे दोहे लिहिले, ते संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे आहेत’, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
प्रा. रतनलाल सोनग्रा यांना साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यदीप पुरस्काराने गौरवण्यात आले. गोवा विधानसभेचे उपसभापती शंभूभाऊ बांदेकर यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. बाबा आढाव, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्रा चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर आदी उपस्थित होते.
सोनग्रा म्हणाले, ‘लेखकाने नुसते लिहून थांबायचे नसते, तर लेखनातून समतेचा विचार समाजाला दिला पाहिजे. अलीकडे पुरस्काराचे कारखाने निघाले आहेत. अशा वेळी कोणता पुरस्कार स्वीकारायचा आणि कोणता नाकारायचा, याचा सारासार विचार करता आला पाहिजे.’ डॉ. सप्तर्षी यांनी सोनग्रा यांच्यासह असलेल्या मैत्रीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
उत्तरार्धात सोनग्रा यांच्या साहित्यावर आधारित ‘सोनजातक’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्योत्स्रा चांदगुडे यांची संकल्पना असलेल्या कार्यक्रमाचे संहिता लेखन कविता क्षीरसागर यांचे होते. स्वाती सामक, धनंजय तडवळकर, माधव हुंडेकर, निरुपमा महाजन, अन्वी आठलेकर आणि कविता क्षीरसागर यांनी अभिवाचन केले. चंचल काळे यांनी सूत्रसंचालन केले.