खडकवासला ‘मेट्रो’ला हवे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:11 AM2018-04-30T04:11:10+5:302018-04-30T04:11:10+5:30
खडकवासला ते स्वारगेट या मेट्रो मार्गाबद्दल महामेट्रो कंपनी सकारात्मक असून, त्यासाठी महापालिकेने आमच्याकडे प्रस्ताव पाठवावा, अशी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आहे.
खडकवासला ते स्वारगेट या मेट्रो मार्गाबद्दल महामेट्रो कंपनी सकारात्मक असून, त्यासाठी महापालिकेने आमच्याकडे प्रस्ताव पाठवावा, अशी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका आहे. उड्डाणपुलापेक्षा हा पर्याय चांगला असून, महापालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे या भागातील बहुसंख्य नगरसेवकांचे मत आहे. महापालिका प्रशासनाने मात्र त्याबाबत अजून काही हालचाल सुरू केलेली दिसत नाही. त्यांचे दुर्लक्ष होत असले तर महापालिका पदाधिकाºयांनी ही मागणी लावून धरली पाहिजे. महापालिकेने तिथे उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. मात्र सातारा रस्ता व हडपसर, पुणे विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय येथील उड्डाणपुलांचा अनुभव पाहिला तर ते वाहतूककोंडी टाळण्यासाठी फारसे उपयोगी पडत नाही असेच दिसते आहे. त्यामुळेच सिंहगड रस्त्यावरचा हा नियोजित उड्डाणपूल रद्द करून महापालिकेने तिथे मेट्रो मार्गासाठी प्रयत्न करायला हवा आहे.
मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांचे काम सध्या सुरू आहे. ते सुरू झाले त्याच वेळी मेट्रोच्या आणखी काही विस्तारीत मार्गांची मागणी सुरू झाली. त्यापैकी पिंपरी-चिंचवडपासून पुढे निगडीपर्यंत व स्वारगेटपासून पुढे कात्रजपर्यंत या दोन मार्गांना तत्त्वत: मान्यताही मिळाली असून, त्याच्या सर्वेक्षणाचे कामही महामेट्रोने सुरू केले आहे. स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालाचा सर्व खर्च पुणे महापालिका देणार आहे. तसाच पुढाकार आता महापालिकेने खडकवासला ते स्वारगेट या मार्गाबाबतही घेणे गरजेचे आहे.
सिंहगड रस्त्यापासून पुढे थेट महापालिका हद्द संपेपर्यंत एकूण ४ प्रभागांतील प्रत्येकी चार याप्रमाणे १६ नगरसेवकांपैकी तब्बल १५ नगरसेवक महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे आहेत. फक्त एक महिला नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या असून त्यांचाही मेट्रोच्या मागणीला पाठिंबा आहे. भाजपाच्याच नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी महापौर, आयुक्त यांना निवेदन देऊन यात लक्ष देण्याची मागणी केली आहे. सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन एक दबाव गट तयार केला तर महापालिका पदाधिकारी व प्रशासन यांना याकडे लक्ष दिल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या सल्ल्याने महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी एक लाख नागरिकांच्या स्वाक्षºयांची मोहीम यासाठी सुरू केली आहे.
गेल्या काही वर्षांत पुण्याच्या उपनगरांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वसाहती झाल्या आहेत. सिंहगड रस्त्यापासून पुढे खडकवासल्यापर्यंतचा परिसर त्यात अग्रभागी आहे. २० लाखांपेक्षाही जास्त नागरिक या परिसरात राहत असतील. त्यांच्यापैकी काही लाख लोक रोज पुण्यात येत व जात असतात. त्यात नोकरदार महिलांचाही समावेश आहे. जीव मुठीत धरून त्या रोज या मृत्यूच्या सापळ्यातून ये-जा करत असतात. सिंहगड रस्त्यावरच्या वाहतुकीची सकाळी
९ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ या वेळात पाहणी केली तर याचा अंदाज येईल. वाहने इतकी वाढली आहेत की कितीही मोठा केला तरी रस्ता अरुंदच वाटेल अशी स्थिती आहे.भविष्यात पुण्याच्या लोकसंख्येत व वाहनांमध्येही आणखी वाढच होणार आहे. मध्यभागात आता जागाच शिल्लक नाहीत. त्यामुळे उपनगरांमध्येच निवासी वसाहती वाढणार व त्यांना कामासाठी रोज शहरात यावे लागणार. सिंहगड रस्ता त्याला अपवाद नाही. त्यामुळे आताच त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. मेट्रोसारखी सार्वजनिक सुविधा मिळाली तर रस्त्यावर येणाºया वाहनांच्या संख्येत नक्कीच घट होईल. अपघात कमी होतील. महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना सुरक्षित प्रवास करता येईल. त्यामुळे या नव्या मेट्रो मार्गासाठी सर्वांनीच प्रयत्नशील
झाले पाहिजे.
- राजू इनामदार