काजव्यांनी प्रकाशला परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:57 AM2018-06-14T01:57:07+5:302018-06-14T01:57:07+5:30
तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात रात्रीच्या वेळी विविध प्रकारच्या झाडांवर तालबद्ध पद्धतीने एखादी रोषणाई केल्याप्रमाणे लुकलुकत्या प्रकाशाच्या नाचासारखे वाटते.
भोर - तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात रात्रीच्या वेळी विविध प्रकारच्या झाडांवर तालबद्ध पद्धतीने एखादी रोषणाई केल्याप्रमाणे लुकलुकत्या प्रकाशाच्या नाचासारखे वाटते. काजव्यांचा हा विद्युत रोषणाईचा खेळ पाहण्यासाठी अनेक नागरिक रात्रीच्यावेळी जंगलात फिरत असतात.
पूर्वी काजवे पाहण्यासाठी भंडारदरा किंवा कोल्हापूरला जावे लागत होते. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरण भागातील खुलशी, भुतोंडे परिसरात व रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला रायरी गावाच्या परिसरात, तसेच वरंध घाटात गाड्यांचे प्रकाश बंद करून शोध घेतल्यास काजव्यांचा प्रकाश दिसतो. मे महिन्याचा शेवटचा आठवडा व जूनचा पहिला पंधरवडा किंवा मृग नक्षत्राच्या काळात ठराविक झाडांवर काजवे ग्रीष्म ऋतूला निरोप देताना आणि वर्षाराणीच्या स्वागतासाठी काजव्यांची लक्ष लक्ष प्रकाशफुले मुक्तहस्ते उधळण करताना दिसत आहेत. हिरडा, बेहडा, अर्जुनसादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच दिवे लावल्याप्रमाणे काजवे स्वयंप्रकाशाची उघडझाप करताना दिसत असल्याचे निर्सगदर्शन पर्यटन संस्थेचे चंद्रशेखर शेळके यांनी सांगितले.
अभ्यासक सांगतात, की कोलोआॅ आॅप्टोरो नावाच्या भुंग्यांच्या कुळात काजव्यांचा समावेश केला जातो. काजवा आळीतून प्रौढावस्थेत जातो, तेव्हा तो स्वयंप्रकाशी बनतो. त्याची लांबी दोन ते अडीच सेंटिमीटर असते. मंद काळसर किंवा पिवळा तांबूस रंगाच्या या कीटकाच्या मादीचे नराचे पंख जास्त विकसित झालेले असतात. पिवळा, हिरवा, नारंगी, निळा, तांबडा, पांढरा अशा रंगाचे काजवे उधळत असतात. त्यांच्या प्रकाशाचा रंग ५१० ते ६७० नॅनोमीटर असतो. मे व जून काळ म्हणजे काजव्यांचा प्रजननकाळ असतो.