ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना कला जीवनगौरव पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 01:15 PM2020-03-07T13:15:02+5:302020-03-07T13:16:16+5:30
टिळक स्मारक मंदिरात रात्रभर कवितांची मैफल रंगणार
पुणे: स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्यातर्फे प्रकाश ढेरे स्मृती प्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना शुक्रवारी जाहीर झाला. पंचवीस हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १२ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिरात रात्री ८.३० वाजता होणाऱ्या कविसंमेलनात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ भाष्य कवी रामदास फुटाणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्यातर्फे ३३ वर्षांपासून कविसंमेलन आणि पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे १२ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिरात रात्रभर कवितांची मैफल रंगणार असून जुन्या आणि नवोदित कवींच्या कविता ऐकण्याची संधी या कार्यक्रमातून साहित्य रसिकांना मिळणार आहे.
यशोदाबाई केशवराव ढोरे स्मृती साहित्य पुरस्कार मंगेश नारायण काळे यांना मायावीये तहरीर या कवितासंग्रहासाठी, बाबासाहेब जाधव स्मृती साहित्य पुरस्कारह्ण संदीप जगदाळे यांना असो आता चाड या कवितासंग्रहासाठी आणि धनाजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार योगिनी राऊळ यांना मुखवटा उतरल्यावर या कवितासंग्रहासाठी देण्यात येणार आहे.
अकरा हजार एक रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी उपस्थित राहणार आहेत. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रामदास फुटाणे करणार आहेत. पत्रकार परिषदेला संजय ढेरे व सुनील महाजन उपस्थित होते.