कळंबला एकाच रात्रीत दहा दुकानांत चोरी, एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:24 AM2018-02-03T02:24:45+5:302018-02-03T02:24:58+5:30
कळंब (ता. आंबेगाव) येथे अज्ञात चोरट्यांनी पहाटे १० दुकानांची शटर उचकटून १२ हजार रुपये व वस्तू चोरून नेल्या आहेत. युको बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. सीसीटीव्ही कॅमे-यात चोरटे कैद झाले आहेत.
मंचर : कळंब (ता. आंबेगाव) येथे अज्ञात चोरट्यांनी पहाटे १० दुकानांची शटर उचकटून १२ हजार रुपये व वस्तू चोरून नेल्या आहेत. युको बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. सीसीटीव्ही कॅमे-यात चोरटे कैद झाले आहेत.
कळंब येथे गुरुवारी पहाटे २.३० च्या दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गावातील १० दुकानांची शटर उचकटण्यात आली. चोरट्यांनी चोरी करून १२ हजार रुपये रोख तसेच दुकानातील किरकोळ वस्तू चोरून नेल्या आहेत. कळंब येथील युको बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. एटीएम मशीनचे अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शाखाधिकारी रामदास डगळे यांनी दिली. चोरट्यांनी कळंब मधील १० दुकानांचे शटर तोडले असून त्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे एक लाख रुपये खर्च येणार आहे. रोहन कानडे यांनी मंचर पोलीस स्टेशन सदर घटनेची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली आहे.
गावातील अनिल चिखले यांच्या श्रीराम हार्डवेअर दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातून दीड हजार रुपये चिल्लर चोरट्यांनी चोरून नेली. तुषार भालेराव यांच्या सर्वज्ञ मेडिकलमधुन पाच हजार रुपये व काही किरकोळ वस्तू तसेच धर्मवीर पतसंस्थेचे शटर उचकटून पिग्मी मशीन व ३०० रुपयांची चिल्लर चोरून नेली. विकास गोसावी यांच्या साईलीला आइस्क्रीम पार्लरमधून आईस्क्रीमची चोरी झाली. रोहन भालेराव यांच्या तिरंगा मोबाईल शॉपी मधून सातशे रुपये चिल्लर चोरून नेली. प्रशांत गुरव यांच्या गुरूदत्त पान स्टॉल मधून रोख रक्कम पंधराशे व काही किरकोळ माल चोरून नेला. अमर कानडे यांच्या जय मल्हार मोबाईल शॉपीतून दोन हजार रुपये चोरीला गेले. तेजस कानडे यांच्या हॉटेल मिलन मधून पाचशे रुपये चिल्लर, सूर्यकांत कानडे यांच्या सूर्यकांत फर्टिलायझर्स अॅन्ड केमिकल्स दुकानातून ५०० रुपयांची चिल्लर चोरीला गेली. चोरीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मंचर पोलीस स्टेशनचे फौजदार बंडापंत घाडगे ,पोलीस आर. जी. करंडे, के. पी. कड, ए. एस. काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोन चोरटे धर्मवीर पतसंस्था व युको बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. पोलीस त्यावरून तपास करत आहेत.
तरुणांच्या प्रसंगवधानामुळे एटीएमची चोरी टळली
चोरट्यांना चोरी करताना पाहून संग्राम ठोकळ या तरुणाने फोनवरून अनिल चिखले, सुरेश कानडे, अमित गोसावी यांना माहिती दिली. यानंतर तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे युको बँकेकडे गेले होते. त्यांचा पाठलाग केला असता तिघे चोरटे बँकेच्या पाठीमागील बाजूच्या ओढ्यात उड्या टाकून पळून गेले. तरुणांच्या प्रसंगवधानामुळे एटीएमची मोठी चोरी टळली.