कळसकर, अंदुरेंनी केला दाभोलकरांवर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 03:27 AM2019-06-26T03:27:17+5:302019-06-26T03:27:30+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्यावर मी व सचिन अंदुरेने गोळीबार केला, अशी कबुली संशयित शरद कळसकर याने न्यायवैद्यकीय चाचणीत दिली आहे
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्यावर मी व सचिन अंदुरेने गोळीबार केला, अशी कबुली संशयित शरद कळसकर याने न्यायवैद्यकीय चाचणीत दिली आहे़ या संबंधीचा अहवाल सीबीआयकडून मंगळवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आला़ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे़
डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती़ कळसकरचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना २५ मे रोजी सीबीआयने अटक केली होती. गेल्या वर्षी जून महिन्यात मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत सीबीआयला सांगितले.
पुनाळेकरप्रकरणीही अहवालाचा आधार
फेब्रुवारी २०१९ मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायलयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपापत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. संजीव पुनाळेकर यांच्या जामिनाला विरोध करताना सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली़