Nalasopara Arms Haul : सीबीआय शरद कळसकरला आज पुणे न्यायालयात आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 12:00 PM2018-09-04T12:00:08+5:302018-09-04T12:05:27+5:30
तब्बल एक आठवडा प्रयत्न केल्यानंतर नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला सत्र न्यायालयाने सीबीआयच्या हवाली केले आहे.
पुणे : तब्बल एक आठवडा प्रयत्न केल्यानंतर नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला सत्र न्यायालयाने सीबीआयच्या हवाली केले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात त्याला रितसर अटक करुन आज दुपारी सीबीआय शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करताना सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळ्या झाडल्याचा सीबीआयचा दावा आहे. सचिन अंदुरे याला सीबीआयने अटक करुन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीवरुन हत्येसाठी वापरलेले पिस्तुलही जप्त करण्यात आले आहे.
दाभोलकर हत्येतील गोळी झाडणारा आरोपी म्हणून पकडलेला सचिन अंदुरे व कळसकरची समोरासमोर चौकशी करण्यासाठी ही कोठडी आवश्यक असल्याचे सीबीआयचे म्हणणे होते. सीबीआयने गेल्या आठवड्यात तसे न्यायालयात सांगितले होते. मात्र त्या सुनावणींमध्ये न्यायालयाने सीबीआयची ही मागणी फेटाळून लावली होती.
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकरची सोमवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने वैभव आणि सुधन्वा यांना 15 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी आरोपी शरद कळसकरला न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोठडीत पाठवले आहे. शरद कळसकर याचा ताबा सीबीआयला मिळाला असला तरी सचिन अंदुरे याला मात्र पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे़