मंत्रालयातील बैठकीच्या निमंत्रणावरून भाजप-राष्ट्रवादीत कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:57+5:302021-06-30T04:08:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहराच्या विविध प्रश्नांवर मंत्रालयात मंगळवारी बैठक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहराच्या विविध प्रश्नांवर मंत्रालयात मंगळवारी बैठक बोलविली होती़ परंतु, या बैठकीचे निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिश: मलाच नाही, तर पुणेकरांना डावलले असल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे़ तर, राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरांचा हा आरोप फेटाळून लावत ज्या २३ जणांना निमंत्रण देण्यात आले होते, त्यामध्ये १२ व्या क्रमांकावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना व्हिसीव्दारे या बैठकीत उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आले असल्याचे कागदोपत्री पुरावे सादर केले आहे़
पुण्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे आणि विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज मुंबईत ही बैठक पार पडली. परंतु, या बैठकीच्या निमंत्रणावरून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला़ आज दुपारीच महापौर मुरलीधर मोहोळ यांनी, महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिश: मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे, अशा भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केल्या. कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केले नसल्याचेही त्यांनी यामध्ये सांगितले़
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही पत्रकार परिषद घेऊन, महापौरांकडून निमंत्रण नसल्याचा कांगावा केला जात असल्याचा आरोप केला़ या वेळी मंत्रालयातील बैठकींचे ज्यांना निमंत्रण होते ते पत्रच त्यांनी सादर करून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी व्हावे, असे निमंत्रण उपमुख्यमंत्री कार्यालयातून २८ जून रोजी महापौरांना देण्यात आले असल्याचे सांगितले होते़ पुणेकरांच्या हितासाठी बैठकीत सहभागी होणे तर दूरच, उलट निमंत्रण नसल्याचा कांगावा महापौर करीत आहेत. महापौरांना राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत तिथे त्यांनी ते जरूर करावे. परंतु पुणेकरांच्या हितात राजकारण करू नये़ महापौरांनी स्वत:च्या संकुचित वृत्तीला पुणेकरांचा अपमान समजू नये, असेही जगताप म्हणाले़
-----------------------
खोटं बोलणं बरं नव्हे !
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या मंत्रालयातील बैठकीचे निमंत्रण नव्हते, असे सोशल मीडियावरून आज जाहीर केले़ परंतु, सुसंस्कृत शहराच्या प्रथम नागरिकाने खोटं बोलणं बरं नव्हे! असा पुणेरी समाचार पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून घेतला आहे़
-------------------