कलिंगडाची शेती धोक्यात, पिकासाठी मिळेना पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:35 PM2018-11-15T22:35:42+5:302018-11-15T22:36:05+5:30
पिकासाठी मिळेना पाणी : हाता-तोंडाशी आलेले उत्पादन वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती
वालचंदनगर : लालपुरी (ता. इंदापूर) येथील शेती महामंडळाच्या कराराने देण्यात आलेल्या शेतावर २० एकरांत कलिंगडाचा प्रयोग करण्यात आला आहे. परंतु तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले असल्याने कलिंगडावर संकट ओढवले आहे. पाण्याची उपलब्धता न झाल्यास लागवडीसाठी खर्च करण्यात आलेले पैसे वाया जाणार असल्यामुळे शेतकरी धास्ताावले आहेत.
वालचंदनगर रत्नपुरी लालपुरी परिसरातील शेती महामंडळाच्या शेकडो एकर जमिनी १० वर्षाच्या करार पध्दतीने देण्यात आल्या आहेत. या शेतीची मशागत करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पेरणीयोग्य करण्यात आले आहे. लालपुरी परिसरात माजी सैनिकांनी ५ एकर जमिनी करार पध्दतीने घेऊन ऊस व कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे. २० एकरात सर्वत्र ड्रीप, सेंद्रिय खत, रासायनिक खत व लागवडीसाठी योग्य जमीन करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.
जून महिन्यात झालेल्या पावसाच्या बाजारात कलिंगडाची वाढती मागणी लक्षात घेऊन मनाची विश्वासार्हता बाळगून २० एकरात कलिंगड लागवड करण्यात आली आहे. परंतु कलिंगडाला पाणी कमी होत चालल्याने पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. निसर्गाने साथ दिल्यास भाडे तत्त्वावर घेण्यात आलेल्या जमिनी या शेतकºयांना परवडणार आहेत अन्यथा लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.