कल्पनाताई थोरवे ( विमेन अचिवर्स)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:39+5:302020-12-11T04:28:39+5:30
लहानपणापासून समाजकार्याची आवड असल्यामुळे आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या कल्पना ताईंनी पुण्यात काम सुरू केलं. प्रथम त्यांच्या घरच्यांनी त्याला ...
लहानपणापासून समाजकार्याची आवड असल्यामुळे आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या कल्पना ताईंनी पुण्यात काम सुरू केलं. प्रथम त्यांच्या घरच्यांनी त्याला विरोध केला पण त्या विरोधाला न जुमानता त्यांनी संघटनेचे काम सुरूच ठेवलं. बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसैनिकांचं दैवत असलेल्या ''''''''साहेबांच्या'''''''' भाषणाने त्या प्रभावित झाल्या. त्यांच्या भेटण्याने तर कायम याच पक्षात राहण्याचा निर्धार त्यांनी केला. 1995 पासून शाखाप्रमुख म्हणून त्यांनी शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. बारामती मतदारसंघात त्यांनी 14 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून तर पुण्यात आठ वर्षे महिला शहर प्रमुख म्हणून काम केले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बालेकिल्ल्यात काम करणे आव्हानात्मक होते, पण ते शिवधनुष्य पेलले. त्यांनी पुणे शहरातील संघटनपण चांगल्या प्रकारे हाताळले. दिवसभर घरातील कामे करून मुलांचे संगोपन करून त्यांनी 14 ते 16 तास पक्ष संघटनेला दिले. यावेळी मात्र माहेरच्यांनी खूप पाठिंबा दिला. सासरच्यांनीही समजून घेतले.
2002 साली शिवसेनेने महानगरपालिकेचे तिकीट दिले. मात्र नगरसेवक म्हणून त्यांना 2012 मध्ये यश मिळाले. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी व्यक्तिगत लक्ष देऊन पाण्याचे आणि रस्त्याचे प्रश्न सोडविले. पाण्याची नवी लाईन टाकून काँक्रिटचे रस्ते केले. ही कामे त्यांनी भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार , दत्तनगर या भागात केली. यासाठी त्यांनी दहा कोटी खर्च केले. आठ कोटींची पाण्याची पाईप लाईन टाकून दोन कोटींचे रस्ते बांधून महिलांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला.
आज कात्रजच्या सगळ्या जुन्या ग्रामीण भागात मुबलक पाणी मिळते. महानगरपालिका शाळेची इमारत वाढवली. एकाच भागातील दोन नगरसेवकांचे पटत नाही अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र कल्पनाताईंनी हे काम काँग्रेसचे अभिजित कदम यांच्या सहकार्याने केले. बाळासाहेब ठाकरे क्रिडांगणाचे काम विकसित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. संभाजीराव थोरवे यांच्या आजीच्या नावाने प्राथमिक आरोग्य केंद्र चालू केले. तसेच महिला स्वावलंबी होण्यासाठी त्या व्यावसायिक प्रशिक्षणही देतात. 1997 पासून त्यांनी महिलांना स्वावलंबी होण्यासाठी विडा उचलला आहे. त्यासाठी त्यांनी राजमाता प्रतिष्ठानतर्फे शिवणकाम,पार्लर, फॅशन डिझायनिंगचे महिलांना शिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः हे शिक्षण घेतले आहे. त्या नेहरू शिक्षण युवा केंद्राशी संलग्न आहेत. त्याद्वारे महिलांना स्वावलंबी केले जात आहे.
तसेच महिलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम त्या घेतात. कोरोना महामारीत सारे पुणे ठप्प असताना लॉक डाऊनच्या काळात देखील शिवसेनेने बरीच कामे केली असल्याचे त्या आवर्जून सांगतात. लॉक डाऊन च्या काळात रस्त्यावर आलेल्या गरीब मजुरांना जेवण तर दिलेच पण पण त्या त्या भागातील कार्यकर्त्यांना डाळ साखर गहू यांचे वाटप करायला सांगितले. रेशनिंगचे वाटपही केले. शिवसेना म्हटले की भैय्या लोक, उत्तर भारतीय घाबरायचे पण त्यांनादेखील शिवसेनेने मदत केल्याचे त्या आवर्जून सांगतात. सिलेंडर पासून रेशन पर्यंत लोकांना मदत केल्याचे त्या सांगतात. पोलीस, सफाई कामगार, आरोग्य विभागातील कर्मचारी यांची विशेष काळजी शिवसेनेने घेतली आहे याचाही त्या आवर्जून उल्लेख करतात.
मतं मिळण्यासाठी नाही तर माणूसकी म्हणून काम केल्याचं त्या सांगतात .
साहेबांना भेटून त्यांचे पदस्पर्श केलेला क्षण आयुष्याला कलाटणी देणारा असल्याचे त्या मानतात. तसेच राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी पतीनेही सहकार्य केल्याचे त्या सांगतात. मातोश्रीवर गेलेला क्षण आठवला की अजूनही काम करण्याची ऊर्जा दुप्पट होते असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे साहेबांचे काम छान असल्याचे कल्पनाताईंनी सांगितले. सतत काम करत राहणे ही त्यांची धारणा असून अवश्यक लोकांना मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे असेही ही त्या म्हणतात.
जुन्या आठवणीत रमताना त्या म्हणाल्या की आम्हाला निवडणूक बोर्ड बनवायला देखील पैसे मिळायचे नाहीत. आम्ही स्वतः रविवार पेठेतून पंचवीस रुपयाचं कापड आणून हाताने त्यावर पेंट करायचो आता असे होताना दिसणार नाही. कोणत्याही क्षेत्रात अनुभवाने माणूस समृद्ध होत असल्याने चांगले तसेच वाईट अनुभव घेतले पाहिजेत असेही त्या म्हणतात.