कोरोना नियमावलीचे उल्लंघन करून कलशारोहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:17+5:302021-05-03T04:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: वाढत्या कोरोणामुळे अनेक निर्बंध घातले असतानाही कुरवंडी येथे ग्रामदैवत चोंभाबाई माता देवीची प्राणप्रतिष्ठा व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: वाढत्या कोरोणामुळे अनेक निर्बंध घातले असतानाही कुरवंडी येथे ग्रामदैवत चोंभाबाई माता देवीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा साजरा करण्यात आला. ८० ते ९० नागरिकांनी एकत्र जमून त्यांनी मिरवणूक काढली. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. तसेच गावागावातील यात्रा उत्सव, देवदेवतांचे उत्सव रद्द करण्यात आले असतानाही आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथे चोंभाबाई माता देवीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी गावातील महिला, पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळा साजरा केला. याप्रकरणी मंचर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिली.
ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना कोरोनाच्या समुह संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडुन कडक नियमावली लागु करण्यात आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडुन लागु करण्यात आलेल्या नियमांची पायमल्ली करत कुरवंडी येथे चोंभाबाई माता मंदिरात प्रतिष्ठापना करत कलशारोहन सोहळा साजरा करण्यात आला आहे.
२८ एप्रिल रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान कुरवंडी येथे आयोजक सुनील गंगाराम तोत्रे, विकास देवराम बारवे,जितेंद्र सिताराम माळूंजे,जयसिंग धोंडू तोत्रे संदीप दत्तात्रेय तोत्रे,तुषार रामदास तोत्रे, नितीन तुकाराम तोत्रे (सर्व रा. कुरवंडी) यांनी कुरवंडी गावचे ग्रामदैवत चोंभाबाई माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करून गावांमधून मिरवणूक काढली.या कार्यक्रमात महिला व पुरुष असे ८० ते ९० नागरिक एकत्र जमले होते. आयोजकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करून तसेच कोरोना विषाणू संसर्ग साथीचा रोग पसरण्यास मदत होईल असे वर्तन केल्याप्रकरणी पोलीस नाईक संजय नाडेकर यांनी फिर्याद दिली आहे.