पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडेला ७ वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 09:56 AM2022-12-20T09:56:21+5:302022-12-20T09:58:05+5:30
दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ वर्षे कारावास भोगावा लागणार...
पुणे : हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवत संघटित गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेसह आणखी एकाला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ वर्षे कारावास भोगावा लागले, असे आदेशात नमूद केले आहे.
देशपांडेसमवेत प्रदीप गवळी यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुण्यातील कोथरूड भागातील एका सोसायटीमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालविल्याप्रकरणी कल्याणी देशपांडे हिला ऑगस्ट २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती.
शहरात संघटितपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी कल्याणी देशपांडेवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी कल्याणी देशपांडे हिच्यावर चतुःशृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, हिंजवडी आदी पोलिस ठाण्यात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. १९९८ पासून ती बेकायदा व्यवसायात सक्रिय आहे. अनेक गुंडांसमवेत तिचे संबंध असल्याने तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी काम पाहिले. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ॲड. फरगडे यांनी युक्तिवादादरम्यान केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत शिक्षा सुनावली आहे.