कल्याणीनगर अपघात प्रकरण: मुलाच्या बालसुधारगृहातील मुक्कामात २५ जूनपर्यंत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 01:23 PM2024-06-13T13:23:32+5:302024-06-13T13:23:48+5:30
Kalyaninagar accident case: मुलाचे मानसिकदृष्ट्या आणि व्यसनाधीनतेच्या बाबतीत अद्याप समुपदेशन सुरू आहे. मुलाची बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा हे अद्याप निश्चित झालेले नाही.
पुणे - मुलाचे मानसिकदृष्ट्या आणि व्यसनाधीनतेच्या बाबतीत अद्याप समुपदेशन सुरू आहे. मुलाची बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा हे अद्याप निश्चित झालेले नाही. अपघाताच्या दिवशीचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, त्यातून मुलाची ओळख सार्वजनिक झाली आहे. त्यामुळे मुलाच्या जिवाला धोका आहे, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम २५ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.
मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचा अर्ज पुणे पोलिसांनी दाखल केला होता. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा अक्षी जैन यांनी मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम वाढविण्याचा आदेश दिला. पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला १२ जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश मंडळाने दिला आहे. ही मुदत संपत असल्याने पोलिसांनी आणखी काही दिवस बालसुधारगृहात ठेवण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज बुधवारी दाखल करण्यात आला होता. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा अक्षी जैन यांनी मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम वाढविण्याचा आदेश दिला.
मुलाच्या मानसिकतेवर परिणाम
मुलाने वृत्तपत्रात आई-वडील, आजोबा यांना अटक झाली, महाबळेश्वरचे रिसॉर्ट पडल्याच्या बातम्या वाचल्या. तो खूप अस्वस्थ झाला आहे. त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे.
त्याला त्यातून बाहेर काढण्याची गरज आहे असे मुलाच्या मानसिक विश्लेषण अहवालात नमूद करण्यात आले असून, बाल न्याय मंडळाकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे.लोकमत न्यूज नेटवर्क,