कल्याणीनगर कार अपघात: अल्पवयीन मुलाच्या मद्यप्राशनासंबंधी टेस्टचा अहवाल ससूनकडून पोलिसांकडे सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 08:34 AM2024-05-22T08:34:58+5:302024-05-22T08:35:33+5:30
अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीवरील दोन तरुणांना उडवले. या मुलाने मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन केले होते, असे पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले....
पुणे : कल्याणीनगरमध्ये कार अपघातात दोन तरुणांचा बळी घेतलेल्या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले की नाही, याबाबतची टेस्ट ससून रुग्णालयात झाली असून, त्याबाबतचा अहवाल ससून प्रशासनाने पोलिसांकडे दिला आहे.
अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीवरील दोन तरुणांना उडवले. या मुलाने मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन केले होते, असे पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हॉटेलमध्येदेखील तो मद्य प्राशन करीत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मुलाला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने मद्यप्राशन केले आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याची टेस्ट करण्यात आली. मात्र त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. यात पोलिसांनी तब्बल अकरा तासांनंतर त्याची टेस्ट केल्यामुळे टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.
मात्र पोलिस आयुक्तांनी ही चर्चा निरर्थक असल्याचा निर्वाळा दिला आहे. कोणताही निगेटिव्ह रिपोर्ट आलेला नाही. आरोपींनी मद्यप्राशन केले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसत आहे. त्यांनी अल्कोहोलसाठी ऑनलाइन पेमेंट केले होते. त्याचे बिल आले आहे. आमच्याकडील पुराव्यावरून आरोपींनी अल्काेहोल घेतल्याचे स्पष्ट झाले असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
कल्याणीनगरमधील अपघात करणाऱ्या अल्पवयीन आरोपीने त्याने मद्य प्राशन केले की नाही, याबाबतची टेस्ट ससून रुग्णालयात झाली आहे. पण, त्याचा अहवाल काय आला, याबाबत आम्ही सांगू शकत नाही. कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याबाबतचा अहवाल आम्ही पोलिसांना दिला आहे.
- डॉ. येल्लापा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय