कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण: "ते" रक्त अल्पवयीन 'बाळा'च्या आईचे नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:53 AM2024-05-31T11:53:00+5:302024-05-31T11:53:48+5:30
१९ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास एका बाळाने दारू पिऊन त्याच्याकडील पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरूण-तरुणीला उडवले होते....
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात बाळाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात मुलाच्या आईनेच ते रक्त दिल्याची चर्चा रंगली असताना रक्ताच्या नमुन्यांचा प्राप्त झालेला अहवाल व ते नमुन्यांसाठी दिलेले रक्त बाळाच्या आईचे नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली. कारण पोलिसांनी नंतर काढलेल्या रक्ताच्या डीएनएशी आईच्या रक्ताचे नमुने जुळले असते. परंतु, पोलिसांच्या तपासात ते नमुने जुळले नसल्याचे यापूर्वीच पोलिसांनी सांगितले आहे.
दाखल गुन्ह्यानुसार, १९ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास एका 'बाळा'ने दारू पिऊन त्याच्याकडील पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरूण-तरुणीला उडवले होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर समाज माध्यमांवर पोलिसांवर तसेच अन्य यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. याप्रकरणी बाळाच्या वडिलांसह त्याच्या आजोबांनादेखील अटक झाली होती. त्याला मद्य पुरवणाऱ्या पब चालकासह मॅनेजरलादेखील अटक झाली होती. याप्रकरणात येरवडा पोलिसांनी दिरंगाई केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर व पोलिस कन्ट्रोल रूमला माहिती न कळवल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते.
याप्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस आयुक्तालयात येऊन प्रकरणाची माहिती घेतली होती. पुढे तपासात 'बाळा'च्या रक्ताचे सकाळी घेण्यात आलेले नमुनेच बदलण्यात आले होते. हे नमुने बदलण्यामध्ये 'बाळा'च्या वडिलांचा सहभाग होता. 'बाळा'च्या वडिलांना अटक झाल्यानंतर त्यांच्यादेखील रक्ताचे नमुने घेण्यात आले होते, तर पोलिसांनी घटनेच्या सायंकाळी अठरा तासानंतर बाळाचे गुपचुप रक्त घेतले होते. अपघाताच्या दिवशी सकाळी घेतलेले रक्त व बाळाच्या वडिलांच्या रक्ताच्या नमुन्यांचा डीएनए जुळला नाही. मात्र, सायंकाळी घेतलेल्या रक्ताचे नमुने आणि बाळाच्या वडिलांच्या रक्ताचे नमुने जुळले.
आमदार टिंगरेंकडून डॉ. तावरेंची शिफारस व्हाया अजित पवार? भावाला केले सातारा जि. प. सदस्य
जर सकाळी घेतलेले रक्त आईचे होते तर सायंकाळी अल्पवयीन बाळाचे घेण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यांशी डीएनए का जुळला नाही. एकीकडे वडिलांच्या डीएनएशी घटनेच्या दिवशी सायंकाळी बाळाचे घेतलेले नमुने जुळले असे बोलले जात असताना मग सकाळी आईचे रक्ताचे नमुने घेतले असतील, त्याचा डीएनए वडिलांच्या डीएनएशी किंवा सायंकाळी बाळाच्या डीएनएशी जुळले नाहीत. यावरून ते रक्त आईचे नसल्याचे पोलिसांनी सांगितले.