अनिशला अमेरिकेत उच्चशिक्षण, नोकरी करायची होती; श्रीमंत बिल्डरच्या ‘बाळा’ने स्वप्नाला दिली 'धडक'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:04 AM2024-05-22T09:04:34+5:302024-05-22T09:09:11+5:30

अनिशला अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण तसेच नोकरीही करण्याची इच्छा होती. मात्र, त्याची ही इच्छा कायमची राहून गेली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी व त्याचा मित्र अकिबने दिली....

kalyaninagar porshe accident Anish awadhiya wanted higher education, job in America | अनिशला अमेरिकेत उच्चशिक्षण, नोकरी करायची होती; श्रीमंत बिल्डरच्या ‘बाळा’ने स्वप्नाला दिली 'धडक'

अनिशला अमेरिकेत उच्चशिक्षण, नोकरी करायची होती; श्रीमंत बिल्डरच्या ‘बाळा’ने स्वप्नाला दिली 'धडक'

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन ‘बाळा’ने शनिवारी मध्यरात्री बेदरकारपणे आलिशान कार चालवत दुचाकीला धडक दिली. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याच अनिशला अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण तसेच नोकरीही करण्याची इच्छा होती. मात्र, त्याची ही इच्छा कायमची राहून गेली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी व त्याचा मित्र अकिबने दिली.

या घटनेनंतर अकिबने माध्यमांशी संवाद साधला. ‘माझ्या डोळ्यासमोरून अजूनही तो प्रसंग जात नाही,’ अशी आपबिती त्याने सांगितली. तो म्हणाला, ‘अनिश आणि अश्विनी यांच्यासह आम्ही सगळे पबमध्ये गेलो होतो. कल्याणीनगर भागातील बॉलर या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो. पुढे काय घडणार आहे ते आम्हाला माहीत नव्हते. आम्ही सगळे घरी जाण्यासाठी बाहेर आलो. तितक्यात डोळ्यासमोर एक भीषण अपघात घडला. माझ्या डोळ्यांसमोरून अजूनही तो प्रसंग जात नाही.’

मी अनिशसोबत डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इंजिनिअरिंग केले होते. अनिश आणि मी एकाच वर्गात होतो. त्यानंतर तो एका कंपनीत इंटर्नशिप करत होता. तेथेच त्याची अश्विनीसोबत ओळख झाली. ते दोघे चांगले मित्रही झाले. अनिश हा खूप हुशार विद्यार्थी होता. त्याला उच्चशिक्षण तसेच नोकरीसाठी अमेरिकेला जायचे त्याचे स्वप्न होते. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा कोडिंगविषयी चर्चा करायचो. एक मित्र म्हणूनही अनिश खूप चांगला माणूस होता, असेही अकिब म्हणाला.

अनिश खूप समजूतदार होता. त्याच्या जाण्याने माझे खूप नुकसान झाले आहे. त्याच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळल्याचे तो म्हणाला. अनिश विमाननगरमध्ये एका घरात भाड्याने राहत होता. त्याला फारसे मित्र नव्हते. तो त्याच्या लहान भावासह त्या घरात राहात होता. आम्हीच त्याचे जवळचे मित्र होतो, असेही तो म्हणाला.

Web Title: kalyaninagar porshe accident Anish awadhiya wanted higher education, job in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.