Pune: कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये वीज नाही, जनरेटरही खराब; PMC चा भोंगळ कारभार
By निलेश राऊत | Published: May 20, 2023 12:49 PM2023-05-20T12:49:00+5:302023-05-20T12:54:03+5:30
गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे...
पुणे : सर्वसामान्य पुणेकरांना वैद्यकीय उपचारासाठी आशेचा किरण असलेल्या महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलला कोणी वाली राहिलेला नाही. आज वीज गेली असता, हॉस्पिटलमधील जनरेटरही काम करत नसल्याचे समोर आले. यामुळे रुग्णालयात शेकडो रुग्णांचे हाल झाले.
गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. अशा वेळी हॉस्पिटलमध्ये तरी पर्यायी व्यवस्था व्यवस्थित कार्यान्वित आहे की नाही हे तपासणे महापालिकेच्या विद्यूत विभागाचे काम आहे. पण आजपर्यंत कमला नेहरू हॉस्पिटलकडे या विभागाचे दुर्लक्षच झाले आहे. रुग्णालयातील एका लिफ्टचे कामही कित्येक दिवस त्यांना करता आले नाही. शनिवारी तर हद्दच झाली या हॉस्पिटलमध्ये जुन्या इमारतीचा विजेचा पुरवठा खंडित झाला. परिणामी डायलिसिस सेंटर, ऑपरेशन थिएटर, लहान मुलांचा १६ नंबर वॉर्ड, १७ व १८ नंबर ओपीडी एवढेच काय तर हृदयरोग विभागाचीही वीज सकाळी सव्वा दहा पासून बंद आहे. या विभागात आयसीयु मध्ये रुग्ण आहेत.
विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये जनरेटर आहे पण त्याची वायर जळल्याने तोही नादुरुस्त होता. यामुळे तीन तासांहून अधिक काळ हॉस्पिटलमध्ये वीज पुरवठा होऊ शकला नाही. महापालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे मात्र रुग्णांचे हाल झाले.
कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असला तरी तो पूर्वरत केला जात आहे. विजेची वाढती मागणी व उष्णता यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी त्या दूर करून विद्युत पुरवठा सुरळीत केला जात आहे.
-श्रीनिवास कंदुल (विद्युत विभाग प्रमुख, महापालिका)