कमला नेहरूतील ‘आयसीयू’ सुरू होण्याआधीच बंद

By admin | Published: February 11, 2015 01:07 AM2015-02-11T01:07:50+5:302015-02-11T01:07:50+5:30

महापालिकेकडून शहरातील सर्वसामान्यांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी आणि रास्त दरात अतिदक्षता विभाग (आयसीयू) उपलब्ध व्हावा

Kamala Nehru's ICU is closed before it starts | कमला नेहरूतील ‘आयसीयू’ सुरू होण्याआधीच बंद

कमला नेहरूतील ‘आयसीयू’ सुरू होण्याआधीच बंद

Next

पुणे : महापालिकेकडून शहरातील सर्वसामान्यांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी आणि रास्त दरात अतिदक्षता विभाग (आयसीयू) उपलब्ध व्हावा या उद्देशाने मंगळवार पेठेतील कमला नेहरू उद्यानात पालिकेकडून गेल्या सहा वर्षांपासून काम सुरू होते. मात्र, आता हे काम आणि त्यासाठीच्या मान्यता पूर्ण झाल्या असून, हा आयसीयू सज्ज असला तरी, आता त्यासाठी डॉक्टरच नसल्याने तो बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. या कक्षासाठी तब्बल १२४ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, यासाठी राज्य शासनाने बंधपत्रित डॉक्टरांसाठी मान्यताही दिलेली आहे. त्यासाठी ७ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. मात्र, त्यानंतर डॉक्टर उपलब्ध करून घेण्याबाबत आरोग्य विभागास वेळच मिळत नसल्याने हा कक्ष सुरू होण्याआधीच बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
महापालिकेने सन २००८ मध्ये या आयसीयूचे काम सुरू केले होते. २०११मध्ये हे काम पूर्ण झाले. या कामासाठी पालिकेकडून तब्बल २० कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला असून, या कक्षाची क्षमता दहा रुग्णांची आहे. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर या कक्षासाठी आवश्यक असलेल्या सेंट्रल आॅक्सिजन युनिटला मान्यता नसल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा तीन वर्षे या मान्यतेसाठी हा कक्ष बंद राहिला. या युनिटला मागील वर्षी मान्यता मिळाली. त्यामुळे हा कक्ष सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण कक्ष सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असताना, तो चालविण्यासाठी डॉक्टर आणि प्रशिक्षित स्टाफ नसल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असल्याने त्यासाठी जवळपास १२४ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, त्यांच्या नेमणुकीच्या हालचालीच होत नसल्याने हा आयसीयू सुरू होण्याआधीच बंद पडण्याच्या मार्गावर आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kamala Nehru's ICU is closed before it starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.