कांबळी की कोल्हे? नियामक मंडळाच्या सदस्यांची ‘गोची’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 07:45 PM2018-03-16T19:45:23+5:302018-03-16T19:45:23+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूकीत प्रसाद कांबळी हे अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात असताना आता अभिनेते अमोल कोल्हे अधिकृत घोषणा करण्यात आल्याने अध्यक्षपदाची लढत रंगणार आहे.
पुणे : मोहन जोशी पँनलकडून अभिनेते अमोल कोल्हे यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी अधिकृत घोषणा करण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांसह नाट्य वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रसाद कांबळी हे अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात असताना कोल्हे यांचे नाव पुढे आल्याने अध्यक्षपदाची लढत रंगणार आहे. मात्र, कोल्हे यांच्या नावामुळे त्यांच्याशी संबंधित पक्षाच्या सांस्कृतिक पदावरील कांबळींना पाठिंबा दर्शविणाऱ्या नियामक मंडळाच्या सदस्यांची चांगलीच ‘गोची’ झाली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीआधी झळकलेल्या फलकांमध्ये अमोल कोल्हे यांचा चेहराच समोर आणण्यात आला होता. त्यामुळे मोहन जोशींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी कोल्हे यांचे नाव पुढे येईल असा एक अंदाज होता आणि अपेक्षेप्रमाणे तसेच झाले. कोल्हे यांचे नाव घोषित करण्यासाठी आयोजित बैठकीत मोहन जोशी पॅनलचे सुमारे ४० जण उपस्थित राहिल्यामुळे अध्यक्षपदासाठी आवश्यक ३१ संख्याबळाचा आकडा जोशी पॅनलकडून ओलांडला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नाट्य परिषदेवर कोल्हे यांच्या रूपात अप्रत्यक्षपणे मोहन जोशी यांचेच प्राबल्य राहील,असे बोलले जात आहे.
दुसरीकडे प्रसाद कांबळी यांनी अध्यक्षपदासाठी चांगलेच ‘सेटिंग’ लावले आहे. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनी अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे.मुंबईत शिवसेनेचे सांस्कृतिक प्राबल्य असून डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे सदस्य आहेत. सुरूवातीपासूनच कांबळी याच्या नावाला नियामक मंडळावर निवडून आलेल्या काही मंडळीनी पाठिंबा दर्शविला आहे.त्यातीलच काहीजण पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीशी संबंधित आहेत. त्यामुळे या परिस्थितीत कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी नियामक मंडळाच्या काही जणांची अनौपचारिक बैठक झाली. त्याबाबत कोणतीही वाच्यता करण्यास त्यांनी नकार दर्शविला. सोमवारी (दि.१९) अध्यक्षपदासाठी अर्ज भरले जाणार आहेत, त्यानंतर बोलू असे सांगण्यात आले आहे.