कनेरसरचे यमाई मंदिर राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:36+5:302021-02-24T04:12:36+5:30
राजगुरुनगर : कनेरसर (ता. खेड) येथील यमाई देवीचे मंदिर कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. माघ ...
राजगुरुनगर : कनेरसर (ता. खेड) येथील यमाई देवीचे मंदिर कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. माघ पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या गर्दीला अटकाव करण्यासाठी तीन दिवस मंदिर बंद राहणार आहे.
कनेरसर यमाई ट्रस्ट व विश्वस्ताची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला पुजारी, गुरव, परडीवाले व ग्रामस्थ उपस्थित होते. खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शनिवार (दि.२७) माघ पौर्णिमा असल्यामुळे भाविक दर्शनासाठी निमगाव व खरपुडी येथे खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. तसेच कनेरसर येथील यमाईमातेचे मंदिर जवळच असल्याने भाविक कनेरसर येथेही दर्शनासाठी येतात. यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी शुक्रवार (दि.२६) पासून रविवारपर्यंत (दि.२८) पर्यंत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. मंदिर बंद असताना मंदिर परिसरातील किरकोळ व्यापारी, मोठे व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थ यांनी जुन्या मंदिर परिसरात देवीचा फोटो तसेच इतर दुकाने लावून गर्दी जमवू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करावी. असे अवाहन भाविक, दुकानदार व ग्रामस्थांना केले आहे. यावेळी यमाई देवस्थान ट्रस्टीचे प्रशासक न्यायाधिस डी. बी. पंतगे, रागिनी खडके, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव व देवस्थान ट्रस्टी तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.