...तर कंगना बरोबर आहे; वादग्रस्त विधानावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 07:09 PM2021-11-12T19:09:32+5:302021-11-12T19:11:54+5:30
सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाला 1947 साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने वादग्रस्त विधान केले आहे
पुणे: 2014 पासून नरेंद्र मोदींनी (narendra modi) केलेल्या कामावर खुश होऊन देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अनुभव नागरिकांना मिळायला लागला, असे कंगना राणावतला म्हणायचे असेल तर ते बरोबर आहे. पण त्यासाठी 1947 च्या स्वातंत्र्यावर टीका करण्याचा अधिकार त्यांना नाही, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून (chandrakant patil) अभिनेत्री कंगना राणावतची (kangana ranaut) पाठराखण करण्यात आली.
सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाला 1947 साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने वादग्रस्त विधान केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली, " स्वातंत्र्य जर भिकेत मिळेल तर ते स्वातंत्र्य असू शकतं का ? 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले" या वक्तव्यानंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात येते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात एका कार्यक्रमात आले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना कंगना राणावतच्या या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, कंगना राणावतच्या भावना नेमक्या काय आहेत मला माहीत नाही. परंतु तिचे वाक्य पूर्णतः चुकीचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर नकारात्मक टिप्पणी करण्याचा अधिकार कुणालाही नाही.
देशात नरेंद्र मोदींची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव मिळतो. दोन वेळचे जेवण मिळत नाही असा माणूसच आता देशात राहिला नाही. 105 रुपयात 35 किलो धान्य मिळत आहे, घरं मिळतायत, स्वच्छतागृह अशी मोठी यादी आहे. 2014 नंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर खूष होऊन नागरिकांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत असेल तर ते बरोबर आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी कंगना राणावतची पाठराखण केली.